वॉशिंग्टन डी.सी. : अमेरिकेतील ४०० सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये मायक्रोसॉफ्टचे जनक बिल गेटस् यांनी सलग २२ व्या वर्षी पहिले स्थान पटकाविले आहे. फोर्ब्ज मासिकाने प्रकाशित केलेल्या अमेरिकेतील श्रीमंतांच्या यादीमध्ये ५९ वर्षे वय असलेल्या गेटस् यांची एकूण संपत्ती ७६ अब्ज डॉलर्स असल्याचे म्हटले आहे.
या चारशे श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये भारतीय वंशाच्या चार व्यक्तींचा समावेश आहे. त्यामध्ये १९४ क्रमांकावर जॉन कपूर, २३४ व्या क्रमांकावर रोमेश टी. वाधवानी, २६८ व्या क्रमांकावर भारत देसाई तर ३५८ व्या क्रमांकावर राम श्रीराम यांचा समावेश आहे. या यादीतील ४०० श्रीमंतांची एकूण संपत्ती २३४० अब्ज डॉलर्स आहे. ही संपत्ती २०१४ मध्ये २२९० अब्ज डॉलर्स होती. अमेरिकेतील श्रीमंतांच्या यादीमध्ये सोशल मिडिया क्षेत्रातील कंपन्यांचा मोठा प्रभाव आढळून आला आहे. त्यामध्ये फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग हे ४०.३ अब्ज डॉलर्ससह सातव्या क्रमांकावर पोचले आहेत. तर गुगलचे लॅरी पेज हे ३३.३ अब्ज डॉलर्ससह दहाव्या स्थानावर विराजमान आहेत.