नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवी मुंबईला देशातील स्वच्छ शहरांमध्ये तृतीय क्रमांकाचे मानांकन लाभले असून पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत विविध कार्यक्रम हाती घेतले जात असून यामध्ये महापालिका पदाधिकारी, नगरसेवक तसेच सर्व नागरिकांचा सक्रीय सहभाग असणार आहे. यादृष्टीने महापालिका अधिकारी – कर्मचारीवृंद नेरुळ रेल्वे स्टेशन बाहेरील परिसर स्वच्छ करीत असून याव्दारे स्वच्छतेचा संदेश प्रसारीत करण्यात येत असल्याचे सांगत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या अभियानांतर्गत ठिकठिकाणी पथनाट्यासारख्या प्रभावी माध्यमातून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती दिली.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत ११ ऑक्टोबर पर्यंत आयोजित करण्यात येत असलेल्या स्वच्छता विषयक विविध कार्यक्रमाचा भाग म्हणून आज महापालिका अधिकारी – कर्मचारीवृंदाने सकाळी ७.३० पासून नेरुळ रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम राबविली त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मोहीमेविषयी माहिती दिली. याप्रसंगी महापालिका आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त शहर अंकुश चव्हाण, स्वच्छ महाराष्ट्र अभियान उपआयुक्त सौ. तृप्ती सांडभोर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ १ उपआयुक्त सुभाष इंगळे, परिमंडळ २ उपआयुक्त सुरेश पाटील, शहर अभियंता मोहन डगांवकर, मुख्य लेखा वित्त अधिकारी धनराज गरड, मुख्य लेखा परीक्षक डॉ. सुहास शिंदे, मालमत्ता विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, सहा. संचालक नगररचना सुनिल हजारे व नगररचनाकार किशोर अग्रहारकर, परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता संजय देसाई, अरविंद शिंदे व सुभाष सोनावणे, सहा. आयुक्त दत्तात्रय नागरे, अनंत जाधव व सौ. संध्या अंबादे आणि इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
स्वच्छता अभियानांतर्गत यापुढील काळात विविध उपक्रम राबविण्यात येत असून काल विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या स्मार्ट सिटी अभियान व स्वच्छ भारत अभियान विषयक नागरिक चर्चासत्राप्रसंगी महापौर सुधाकर सोनवणे यांच्यासह उपस्थित नागरिकांनी वैयक्तीक व शहर स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली. आजही महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी अधिकारी-कर्मचारीवृंदासह स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केल्यानंतर नेरुळ रेल्वेस्टेशन परिसर स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कलापथकाने स्वच्छतेविषयक जनजागृतीपर पथनाट्य सादर केले.
दि. २ ऑक्टोबर २०१५ रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून सकाळी ७.३० वा. महापालिका मुख्यालयासमोरील पामबीच रस्त्यावरून मोराज सर्कल, सानपाडाच्या दिशेने स्वच्छतेचा संदेश सर्वदूर प्रसारीत करण्यासाठी ‘मानवी साखळी’ चे आयोजन करण्यात आले असून या साखळीमध्ये विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व वयोगटाच्या नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी होऊन स्वच्छतेबाबतची जागरुकता दाखवावी व स्वच्छता संदेश प्रसारीत करण्यासाठी आपले अनमोल योगदान द्यावे असे आवाहन सर्व नागरिकांना महापौर सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
यासोबत ४ ऑक्टोबर रोजी विभागाविभागात नागरिक पातळीवर स्वच्छता अभियान राबविले जात असून ६ ऑक्टोबर रोजी महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी स्वच्छतेची शपथ दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे ११ ऑक्टोबरपर्यंत स्थानिक पातळीवर स्वच्छताविषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये शाळांतून विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करुन विद्यार्थ्यांच्या मनात माहिती-ज्ञान व कलेच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश बिंबविण्यात येणार आहे. विभागीय स्तरावर आंतरसोसायटी स्वच्छता स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. या सर्व स्पर्धांतील विजेत्या स्पर्धकांना स्वच्छतेविषयी चांगली कामगिरी केल्याबद्दल पारितोषिके प्रदान करुन प्रोत्साहीत करण्यात येणार आहे व या माध्यमातून स्वच्छ व हरित नवी मुंबईचा संदेश मोठ्या प्रमाणावर जनमानसात प्रसारीत केला जाणार आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवी मुंबईचे देशातील तृतीय मानांकन उंचाविण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाहीला गतीमान सुरुवात झाली असून हागणदारीमुक्त शहर संकल्पना पुर्णत्वास आणण्यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यासाठी वैयक्तिक, सामुहिक तसेच सार्वजनिक स्वरुपात शौचालय सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांनी सांगितले. शहरात दररोज निर्माण होणार्या कचर्याची वाहतुक अधिक उत्तम करण्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे, तसेच देशभरात नावाजल्या जाणार्या तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये अधिक सुधारणा करण्यात येऊन कच-यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिका शहर स्वच्छतेसाठी कृतीशील असून नवी मुंबईकर नागरिकांनीही नवी मुंबई शहर स्वच्छ व हरित ठेवण्यासाठी आपले कर्तव्य समजून सहभागी व्हावे आणि नवी मुंबई शहर अस्वच्छ होणार नाही याची काळजी घ्यावी व त्यासाठी आठवड्यातून किमान दोन तास श्रमदान करावे असे सांगत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दि. २ ऑक्टोबर रोजी होणार्या मानवी साखळीत नवी मुंबईतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व स्वच्छतेचा संदेश प्रसारीत करण्यामध्ये आपले अनमोल योगदान द्यावे असे आवाहन याप्रसंगी केले.