नवी मुंबई : नवी मुंबई शहराची संस्कृती ही कोणत्याही प्रकारच्या भेदा-भेदांच्या पलीकडली संस्कृती असून नवी मुंबईच्या जडणघडणीत येथील ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा उपयोग झाला आहे. मुलांना मोठे करताना आई वडील आपले सर्वस्व पणाला लावतात मात्र काही घरात ज्येष्ठ नागरिकांना अपमान, अवहेलना सहन करावी लागते. आपल्या कुटुंबाची प्रतिमा खराब होईल म्हणून अनेक ज्येष्ठ नागरिक कुचंबणा सहन करीत राहतात. अशा वंचित ज्येष्ठ नागरिकांची मुले बनण्याचे काम करुया या भावनेतून नवी मुंबई महानगरपालिका काम करीत असून ज्येष्ठ नागरिकांना सन्मान देण्याची व त्यांच्यासाठी भरीव काम करण्याची महानगरपालिकेची भूमिका राष्ट्रीय स्तरावर नावाजली जाते तेव्हा समाधान वाटते अशा शब्दात माजी मंत्री गणेश नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या विशेष समारंभाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती सौ. नेत्रा शिर्के, सभागृह नेते जयवंत सुतार, आरोग्य समितीच्या सभापती सौ. पुनम पाटील, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती प्रकाश मोरे, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समितीच्या सभापती सौ. मोनिका पाटील, विद्यार्थी व युवक कल्याण समितीचे सभापती गिरीश म्हात्रे, नगरसेवक रविंद्र इथापे, अनंत सुतार, शशिकांत राऊत, घनशाम मढवी, लिलाधर नाईक, मुनावर पटेल, रमेश डोळे, सौ. सायली शिंदे, सौ. मिरा पाटील, सौ. संगिता बोर्हाडे, श्रीम. सिमा गायकवाड, सौ. तनुजा मढवी, परिवहन सदस्य श्री. प्रदिप गवस, ज्येष्ठ नागरिक स्वतंत्र कक्षाचे सदस्य भ.रा.शेजाळे व श्रीम. शालिनी इंगळे तसेच इतर मान्यवर नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
उपमहापौर अविनाश लाड यांनी यावेळी बोलताना नवी मुंबई महानगरपालिका ज्येष्ठ नागरिकांची सेकंड होम मानली जाणारी विरंगुळा केंद्रासारखी सुविधा मनोरंजक साधनांसह पुरविते, एन.एम.एम.टी बस सेवेत तिकीट दरात सर्वात जास्त 75 टक्के सवलत देते, महापालिका रुग्णालयात विनामुल्य उपचार व उपचारांमध्ये प्राधान्य देते अशा विविध माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांप्रती आदराची व आपुलकीची भावना जतन केली जात असून ज्येष्ठ नागरिक हा शहराचा अनमोल ठेवा आहे अशी भावना व्यक्त केली. स्वच्छतेची सामुहिक शपथ सर्वांसह घेत उपमहापौरांनी स्वच्छतेच्या बाबतीत देशात तृतीय क्रमांक असणारे नवी मुंबई शहर ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा उपयोग करुन देशात नंबर 1 होईल असा विश्वास व्यक्त केला.
महापौरांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणारा ज्येष्ठ नागरिक स्वतंत्र कक्ष हे नवी मुंबई महानगरपालिकेचे वैशिष्ट्य असून यामध्ये आम्हाला ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करता येतात, सूचना करता येतात, मागणी मागता येते व महानगरपालिका त्या पूर्ण करते अशा शब्दात स्वतंत्र कक्षाच्या सदस्य श्रीम. शालिनी इंगळे यांनी महानगरपालिकेच्या ज्येष्ठांप्रती असलेल्या आपुलकीच्या भावनेचे कौतुक केले व आज देशात गाजत असलेले महानगरपालिकेचे नाव भविष्यात आशिया खंडात व जगात गाजेल असा विश्वास व्यक्त केला.
समाज विकास विभागाच्या उप आयुक्त सौ. तृप्ती सांडभोर यांनी स्वच्छ भारत अभियानाविषयी माहिती दिली. तसेच सहा. आयुक्त सौ. संध्या अंबादे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी महानगरपालिका करीत असलेल्या कामांची माहिती दिली.
याप्रसंगी वयाचा अमृत महोत्सव पूर्ण करणार्या 131 ज्येष्ठ नागरिकांचा तसेच विवाहाचा सुवर्ण महोत्सव साजरा केलेल्या 29 दांपत्यांचा सत्कार करण्यात आला. सिनियर सिटीझन वेलफेअर असोसिएशन, से. 8. सी.बी.डी. बेलापूर, ज्येष्ठ नागरिक संघ, से. 12, नेरुळ आणि ज्येष्ठ नागरिक संघ से. 7, सानपाडा या ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थांना उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक संस्था पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या विविध कलागुणदर्शनपर स्पर्धांमध्ये निवृत्ती जाधव, भरत खरात, लक्ष्मण गावडे हे वेशभुषा स्पर्धेचे अनुक्रमे 3 विजेते ठरले. नाटिका स्पर्धेत सौ व चंद्रकांत पारपिल्लेवार, सौ. प्रमिला कार्ले, गणपत बारस्कर हे तसेच काव्य वाचन स्पर्धेत शांतीदेव गुप्ता, बळीराम इंगळे, भरत खरात अनुक्रमे 3 क्रमांकाचे विजेते ठरले. निबंध स्पर्धेत रमेश परांजपे, आचार्य विठ्ठल कोळी, मोहनलाल तेली यांना 3 क्रमांकाच्या पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. स्वरगट अंताक्षरी स्पर्धेतील विजेता गट ठरला.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणजे ज्येष्ठांचा आनंद दिवस अजित मेस्त्री यांनी साकारलेल्या ऑल टाईम क्लासीक या हिंदी मराठी गीतांच्या वाद्यवृंदामुळे आनंददायी झाला.