नवी मुंबईः नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने या शहरासाठी पालकमंत्री, खासदार आणि आमदार हेही काम करतात याचे भान ठेवावे. फक्त कौटुंबिक सोहळे साजरे करु नयेत. प्रोटोकॉल पाळून मान्यवरांना निमंत्रित करावे, असा संताप व्यक्त करुन ‘शिवसेना-भाजप युती’च्या नगरसेवकांनी १ ऑक्टोबर रोजी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांना घेराव घातला.
नवी मुंबई महापालिकेच्या विविध कार्यक्रमांमध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, ‘ठाणे’चे खासदार राजन विचारे यांना डावलले जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ‘शिवसेना- भाजप युती’च्या नगरसेवकांनी भाजप युती’च्या नगरसेवकांनी शुक्रवार, दि. १ ऑक्टोबर रोजी ‘बेलापूर’च्या भाजपा आमदार मंदाताई म्हात्रे आणि महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांना घेराव घातला.
महापालिकेच्या प्रत्येक कार्यक्रमात प्रोटोकॉल पाळला जात नाही. जे लोकप्रतिनिधी या शहरातून निवडून आणले आहेत, त्यांना मानसन्मान दिला जात नाही. या शहरातील जे माजी लोकप्रतिनिधी
आहेत त्यांची नावे ठळक अक्षरात महापालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेत वर लिहिली जात आहेत. महापालिकेचे कार्यक्रम कौटुंबिक सोहळ्यासारखे साजरे होत आहेत, असा आरोप यावेळी आ. मंदाताई म्हात्रे यांनी केला.
या आंदोलनाप्रसंगी शिवसेनेचे गटनेते द्वारकानाथ भोईर, शहरप्रमुख विजय माने, नगरसेवक एम. के. मढवी, शिवराम पाटील, काशिनाथ पवार, संजू वाडे, ज्ञानेश्वर सुतार, जगदीश गवते, सरोज पाटील, राजेश शिंदे, आकाश मढवी, चेतन नाईक, ‘भाजप’चे रामचंद्र घरत आदि उपस्थित होते.