मुंबई: नवी मुंबईच्या राष्ट्रवादीच्या बेपत्ता नगरसेविका शशिकला मालदी यांनी आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. २३ सप्टेंबरला सापडलेला अज्ञात मृतदेह हा शशिकला मालदी यांचाच असल्याचं उघड झालं आहे.
शशिकला मालदी या २३ सप्टेंबरपासूनच बेपत्ता होत्या. त्याच दिवशी मानखुर्दजवळ रेल्वे ट्रॅकवर एक मृतदेह सापडला होता. मात्र हा मृतदेह कोणाचा याची ओळख पटत नव्हती. मात्र आता हा मृतदेह शशिकला यांचाच असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, मानसिक तणावाखाली असल्याने शशिकला मालदी यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
शशिकला या नवी मुंबई महानगरपालिकेतील वॉर्ड क्र.८८ च्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका होत्या. त्या आरक्षित प्रभागातून निवडून आल्या होत्या. मात्र त्यांच्या उमेदवारीवर काहींनी शंका उपस्थित केली होती. त्याबाबत माहिती अधिकाराअंतर्गत माहितीही मागवण्यात आली होती. याशिवाय काही गणपती मंडळाबाबतही त्यांचे वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान शशिकला २३ सप्टेंबरपासून बेपत्ता झाल्यानंतर, घरच्यांनी त्यांची शोधाशोध केली. त्यानंतर पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यावेळी शशिकला मानसिक तणावाखाली असल्याचं त्यांच्या मुलीने सांगितलं होतं. त्यावरूनच पोलिसांनी प्राथमिकदृष्ट्या ही आत्महत्या असल्याची नोंद करत, मानसिक तणावामुळे आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला आहे.