नवी दिल्ली : प्रतिष्ठेची बिहार विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आपली पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रीय मंत्र्यांची फौज बिहारच्या रणमैदानात उतरवली आहे.
निवडणुकीच्या जमिनी स्तरावरील व्यवस्थापनासाठी शहा यांनी पूर्ण मनुष्यबळ कामाला लावले आहे. दिल्ली हरल्यानंतर देशभरात अजूनही भाजपाची लाट टिकून आहे हा संदेश देण्यासाठी बिहार जिंकणे भाजपासाठी अनिवार्य बनले आहे.
बिहार गमावले तर, मोदी लाट संपल्याचा संदेश संपूर्ण देशात जाईल आणि ग्रामपंचायतीपासून प्रत्येक निवडणूक भाजपासाठी अधिक आव्हानात्मक बनेल. निवडणूकीसाठी शहा यांनी बिहारची १२ झोनमध्ये विभागणी केली आहे. बिहारमध्ये एकूण ३७ जिल्हे असून, प्रत्येक झोनमध्ये तीन जिल्ह्यांचा समावेश केला आहे. प्रत्येक झोनसाठी एका केंद्रीय मंत्र्यांची राजकीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवीशंकर प्रसाद, गिरीराज सिंह, राधा मोहन सिंह, थावर चंद गेहलोत, राजीव प्रताप रुड्डी, जे.पी.नड्डा या मंत्र्यांकडे निवडणूकीची जबाबदारी विभागून देण्यात आली आहे.