नवी मुंबई / विशेष प्रतिनिधी
गेल्या आठवड्याभरापासून बेपत्ता असलेल्या नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या नेरुळमधील नगरसेविका शशिकला मालदी (43) यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. ज्या दिवशी त्या बेपत्ता झाल्या होत्या, त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मानखुर्द-गोवंडी रेल्वे स्थानकादरम्यान शशिकला यांनी मालदी यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. तथापि नगरसेविका मालदी यांची आत्महत्या की हत्या याबाबत नवी मुंबईकरांमध्येही संभ्रम निर्माण झाला असून दिवसभर याच चर्चेला उधान आले होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका शशिकला मालदी यांनी महापालिका निवडणुकीच्या वेळी सादर केलेले जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा आक्षेप घेऊन त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणार्या काँग्रेसच्या उमेदवार नयन राऊत आणि त्यांचे पती दिगंबर राऊत यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यातच मालदी यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास देखील विलंब झाल्यामुळे शशिकला मालदी या तणावाखाली होत्या. गणेशोत्सवाच्या काळात नगरसेविका शशिकला मालदी यांनी सार्वजनिक गणपती बसवू नये यासाठी देखील त्यांच्या प्रभागातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध करुन वाद निर्माण केला होता. त्यानंतरही नगरसेविका मालदी यांनी पोलीस आणि महापालिकेकडून परवानगी मिळविली होती. मात्र, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंडप उभारताना देखील त्यांना विरोध केला होता. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत नगरसेविका मालदी यांचे भांडण देखील झाले होते. सदर वाद नेरुळ पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करुन सदर वाद मिटविला होता.
नवी मुंबई महापालिकेच्या नेरुळ प्रभाग क्र. 88 मधील ओबीसी महिला मतदारसंघातून शशिकला मालदी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या उमेदवारीवर निवडून आल्या होत्या. गत 23 सप्टेंबर रोजी त्या घरातून अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध केली होती. मात्र, त्यांचा शोध न लागल्याने अखेर 28 सप्टेंबर रोजी त्यांची मुलगी अनुराधा मालदी हिने नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सदरची तक्रार दाखल झाल्यानंतर नेरुळ पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी लातूर येथील त्यांच्या मुळ गावी जाऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, विक्रोळी रेल्वे स्थानकात कार्यरत असलेले स्टेशनमास्तर मधुकर पवार शशिकला मालदी यांना बहिण मानत असल्याने 2 ऑक्टोबर रोजी सकाळी ते शशिकला मालदी यांच्या शोधात वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात आले होते. तेथे त्यांना 23 सप्टेंबर रोजी मानखुर्द-गोवंडी रेल्वे स्थानकादरम्यान एका महिलेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचे कळले. त्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृत पावलेली महिला नेरुळ मधील नगरसेविका शशिकला मालदी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बोबडे यांनी मालदी यांच्या नातेवाईकांना राजावाडी हॉस्पीटलमध्ये बोलावून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटविली. त्यानंतर मालदी यांचा मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला. लोकलची धडक बसून मालदी यांचा मृत्यू झाल्याची नोंद वाशी रेल्वे पोलिसांनी केली आहे.
दरम्यान, नेरुळ सेक्टर-3 मधील प्रभाग क्र. 88 मधील नगरसेविका असलेल्या शशिकला मालदी निवडणुकीच्यावेळी सादर केलेल्या जात प्रमाणपत्रावर काँग्रेसच्या उमेदवाराने आक्षेप घेऊन त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. त्याचप्रमाणे गणेशोत्सवामध्ये देखील विरोधकांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास दिला होता. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून त्या तणावाखाली वावरत होत्या. यातूनच त्यांनी लोकलखाली येऊन आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
एकूणच या सर्व प्रकारामुळे गेल्या महिन्याभरापासून शशिकला मालदी या मानसिक तणावाखाली वावरत होत्या. याच तणावातून त्या 23 सप्टेंबर रोजी घरातून निघून गेल्या होत्या, अशी तक्रार शशिकला मालदी यांचा मुलगा सुशांतककुमार मालदी याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. मात्र, नगरसेविका मालदी यांचा अपघाती मृत्यू झाला की सदर आत्महत्येचा प्रकार आहे याबाबत पोलीस संभ्रमात आहेत.