नवी मुंबई: गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबईतून मुंबईसाठी जलवाहतुकीच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिक-प्रवाशांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे. लवकरच नवी मुंबईतून मुंबईला जाण्यासाठी जलवाहतूक सुरु केली जाणार असून सदर प्रवास अवघ्या २० ते २५ मिनिटात पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी महाराष्ट्र शासन पातळीवर मोठ्या प्रमाणावर कार्यवाही सुरु झाली असून या सेवेचा शुभारंभ येणार्या २६ जानेवारी २०१६ रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
मुंबईतील भाऊचा धक्का ते नवी मुंबईत एनआरआय जेट्टी आणि भाऊचा धक्का ते मांडवा बीच (अलिबाग) अशी प्रवाशी जलवाहतूक सुरु करण्यासंबंधीची बैठक नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पार पडली. या बैठकीला सिडको, मुंबई मरीन बोर्ड आणि बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत भाऊचा धक्का ते एनआरआय आणि भाऊचा धक्का ते मांडवा अशी हायस्पीड केटामरीन बोट सुरु करण्यावर मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्याचे समजते. या जलवाहतुकीच्या अनुषंगाने तीन ठिकाणी जेट्टीची उभारणी करण्यात येणार आहे. यात भाऊचा धक्का येथे जेट्टीची उभारणी बीपीटी करणार आहे. त्यासाठी साधारणत: ५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मांडवा येथे जेट्टीची उभारणी मुंबई मरीन बोर्ड करणार असून त्यासाठी ७० कोटी रुपये खर्च होणार आहे. तर नवी मुंबईत एनआरआय येथे सिडको महामंडळ जेट्टीची उभारणी करणार असून त्यासाठी जवळपास १२० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या जलवाहतूक सेवेमुळे मांडवा ते मुंबई असे जवळपास ११० कि.मी.चे अंतर जलवाहतुकीद्वारे केवळ १० कि.मी. होणार आहे. या जलवाहतुकीसाठी डोरा पॅक्स कंपनीची केटामरीन सेवा उपलब्ध केली जाणार आहे. विशेष म्हणजे सर्वच ठिकाणी जेट्टी अत्याधुनिक पध्दतीने उभारल्या जाणार आहे. या सर्व जेट्टी प्लोटींग पध्दतीने पाण्याच्या पातळीनुसार कार्यरत राहणार आहेत. या सर्व कामांसाठी पुणे येथील काश्क इंजिनिअरींग प्रा. कंपनी ची सल्लागार म्हणून नियुक्ती करणार असून सदर कंपनी ऑडीट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटन्ट म्हणून देखरेख ठेवणार आहे.
विशेष म्हणजे सिडको महामंडळातर्फे एनआरआय कॉम्प्लेक्सच्या मागील बाजुस जेट्टी उभारणीचे काम लवकरच सुरु होणार आहे. याठिकाणी अत्याधुनिक जेट्टीसह किनार्यालगत पार्किंग, कार्गो शिफ्टींग, कार-बस-ऑटो पार्किंग, आदि सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकत्याच पार पडलेल्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीतही मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, ‘सिडको’तर्फे काही वर्षांपूर्वी वाशी आणि सीबीडी येथून हॉवरक्राफ्ट सेवा पुरविली जात होती. पण, पुरेसे प्रवाशी नसल्याचे कारण देत सदरची सेवा बंद करण्यात आली. यानंतर गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबईकरांकडून मुंबईसाठी जलवाहतूक सेवेची मागणी सातत्याने होत आहे. सदर सेवेमुळे नवी मुंबईकरांची जलवाहतुकीसाठीची खूप वर्षांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे.