नवी मुंबई / विशेष प्रतिनिधी
श्रीगणेशोत्सव कालावधीतील श्रीमुर्ती विसर्जनप्रसंगी मुर्तीसोबत येणार्या निर्माल्याबद्दलची नागरिकांची मनोभावना लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने निर्माल्य संकलनासाठी २३ विसर्जन स्थळांवर निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली होती. या निर्माल्याच्या वाहतुकीसाठी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत स्वतंत्र निर्माल्य वाहतुक वाहन ठेवण्यात आले होते. हे निर्माल्य तुर्भे प्रकल्पस्थळी या स्वतंत्र वाहनाव्दारे नेण्यात येऊन त्यावर प्रक्रीया करण्यासाठी त्याठिकाणी निर्माल्याचे पावित्र्य जपत स्वतंत्र राखीव जागाही ठेवण्यात आली होती.
१७ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०१५ या कालावधीत संपन्न झालेल्या श्रीगणेशोत्सवामध्ये दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस व दहा दिवसाच्या गणेशमुर्ती विसर्जनाच्या वेळी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकुण ७३ मेट्रीक टन एवढे निर्माल्य जमा झालेले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व विभागांतून निर्माल्य संकलीत करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत एकुण ८ बंदिस्त कॉम्पॅक्टर व १२ छोटे बंदिस्त टिप्पर अशा एकुण २० बंदिस्त व स्वच्छ वाहनांव्दारे निर्माल्य एकत्रित करण्यात आले. निर्माल्य एकत्रित करण्यात आलेल्या वाहनांना निर्माल्य वाहतुक वाहन असे संबोधण्यात आले.
या निर्माल्य वाहतुक वाहनांद्वारेव्दारे संपूर्ण नवी मुंबई क्षेत्रात दि. १७ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०१५ या कालावधीतील गणपती विसर्जनाच्या काळात जमा झालेले एकुण ७३ मेट्रीक टन निर्माल्य नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विकसीत करण्यात आलेल्या तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी स्वतंत्र प्रक्रीया स्थळ निर्माण करुन एकत्रित करण्यात आले. या प्रक्रिया स्थळी निर्माल्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया सुरु करण्यात आलेली असून ७३ मेट्रीक टन निर्माल्यापासून साधारणत: ३० ते ३२ मेट्रीक टन सेंद्रीय खताची निर्मिती केली जाणार आहे.
श्रीगणेश विसर्जनाच्या काळातील निर्माल्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रियेसाठी साधारणत: २८ दिवसांचा कालावधी लागणार असून अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेने श्रीगणेश विसर्जनाच्या काळातील निर्माल्याचे पावित्र्य राखून सेंद्रीय खत निर्मिती करण्याच्या हाती घेतलेल्या उपक्रमाबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.