नवी मुंबईः नवी मुंबई महापालिकेने शहरातील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करून १९,०८९ पात्र झोपडीधारकांचे बायोमेट्रिक ओळखपत्रे तयार केली आहेत. परंतु, गत १३ वर्षांमध्ये त्यातील फक्त २६० ओळखपत्रांचेच वाटप केले आहे. परिणामी, तब्बल १८,८२९ ओळखपत्रे धुळखात पडून आहेत. त्यामुळे पात्र झोपडपट्टीवासियांना त्यांचे फोटोपास देण्याची मागणी ‘बेलापूर’च्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
विशेष म्हणजे २००१ मध्ये झोपडपट्टीधारकांचे सर्वेक्षण केल्यानंतर २२,७१६ झोपड्या अपात्र ठरविण्यात आल्या होत्या. परंतु, राज्य सरकारने २००० पर्यंतच्या झोपड्या कायम करण्याचे जाहिर केले आहे. मात्र, त्या धोरणामध्ये किती झोपड्या बसणार हेही महापालिकने अद्यापपर्यंत स्पष्ट केलेले नाही. सरकारच्या निर्णयामुळे महापालिकेने नवी मुंबईतील पात्र झोपडीधारकांची ओळखपत्रे का दिली नाहीत याबाबतचा प्रश्नही अनुत्तरित आहे. कर्मचारी कमी असल्यामुळे ओळखपत्रे वाटली नसल्याचे कारण आता पुढे केले आहेत. पण, त्यासाठी १३ वर्षे का लागली ते मात्र कोणीच सांगत नसल्याचे
आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. झोपडपट्टीधारकांना जाणिवपूर्वक ओळखपत्रे दिली जात नसल्याचा आरोप आ. म्हात्रे यांनी केला आहे. त्याअनुषंगाने आ. मंदाताई म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेवून त्यांच्याकडे पात्र झोपडट्टीवासियांना त्वरित ओळखपत्र वाटप करण्याची मागणी केली. आमदार म्हात्रे ाांच्या सदर मागणीवर आयुक्त दिनेश वाघमारे यांनीही सहमती दर्शविली आहे. झोपडपट्टीधारकांची फसवणूक होत आहे. कर्मचारी कमी असणे असे कारण होवू शकत नसल्याची खंत आ. म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे महापालिकेने झोपडपट्टीधारकांची ओळखपत्रे वाटली नसल्यामुळे सन २०११-१२ च्या लेखा परीक्षण अहवालामध्ये ताशेरेही ओढण्यात आलेले आहेत. महापालिकेने झोपडीधारकांना वेळेत ओळखपत्रे वाटली नसल्यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. पण, यानंतरही महापालिका प्रशासनाने झोपडीधारकांना ओळखपत्रांचे वाटप केलेले नसल्याचे आ. मंदाताई म्हात्रे यांचे म्हणणे आहे.
महापालिकेने शहरातील झोपडपट्टीधारकांना ओळखपत्रांचे वाटप न केल्याने पात्र झोपडीधारक गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत हेलपाटे घालत आहेत. महापालिका प्रशासनाकडून गरीब नागरिकांची अडवणूक केली जात आहे. त्यामुळे पात्र झोपडीधारकांना त्वरित ओळखपत्रांचे वाटप करण्याची मागणी आमदार म्हात्रे यांनी आयुक्त वाघमारे यांच्याकडे केली आहे.