रत्नागिरी : यंदाचा पाऊस परतीच्या प्रवासाला लागला आहे. बुधवारी रात्री कोसळलेल्या तुरळक सरीनंतर गुरुवारी सायंकाळी परतीच्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह विजांच्या लखलखाटात परतीच्या पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. रत्नागिरीतील कारवांचीवाडी परिसरात गारांचा पाऊस पडला. सिंधुदुर्गातही परतीच्या पावसाने हजेरी लावली. मात्र कोठेही नुकसानाची नोंद नाही. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही धुवाँधार पाऊस झाला.
झाडे कोसळल्याने अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक खोळंबली. सकाळी मुंबई गोवा महामार्गावर झाड कोसळल्याने कणककवली येथे काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती.
कोकणामध्ये जुलै आणि ऑगस्ट हे कोरडेच गेले. सरासरीपेक्षा यंदा खूपच कमी पाऊस पडला. त्यामुळे नोव्हेंबर- डिसेंबरपासून पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या अखेरपासून उकाडयात प्रचंड वाढ झाली होती. बुधवारी दिवसभर घामाच्या धारा वाहत होत्या. त्याच रात्री पावसाने जिल्ह्यात हलक्या सरी कोसळल्या. गुरुवारी सकाळपासून पुन्हा उकाडयात वाढ झाली. सायंकाळी परतीच्या पावसाने हजेरी लावली. रत्नागिरी तालुक्यासह लांजा, राजापूर, संगमेश्वर, गुहागर, दापोली सर्वच तालुक्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली. चार वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला पाऊस तासभर कोसळत होता.
गुरुवारी कोसळलेल्या परतीच्या पावसासह रत्नागिरी तालुक्यातील कारवांची वाडी येथे गारांचा पाऊस पडला. या गारांच्या पावसामुळे ग्रामस्थांची एकच धावपळ उडाली.