नवी मुंबई : महापालिकेच्या आरोग्य विभागात परिचारिकांची संख्या कमी असल्याने दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पालिका प्रशासनाने यापुढे कंत्राटीएवजी कायम तत्वावर परिचारिकांची भरती करण्याची मागणी सिडकोचे माजी संचालक व शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून कंत्राटी कामगार महापालिकेत कार्यरत आहेत. नवी मुंबईकरांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि नवी मुंबईकरांच्या नागरी समस्या सोडविण्याचे महत्वपूर्ण काम या कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून केले जात आहे. याच कंत्राटी कामगारांच्या परिश्रमामुळे, लोकप्रतिनिधीच्या जागृकतेमुळे व प्रशासनाच्या सहयोगामुळे महानगरपालिका प्रशासनास राज्यात दोन वेळा प्रथम क्रमाकांचे संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये पारितोषिक मिळालेले आहे. आरोग्यासारख्या महत्वपूर्ण सेवेमध्ये आपण परिचारिकादेखील कंत्राटी तत्वावर भरती करत आहोत, याचेच शल्य आम्हाला जाणवत असल्याचे नामदेव भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.
कर्मचारी संख्या कमी असतानाही महापालिका प्रशासनाचा आरोग्य विभाग दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत आहे, ही खरोखरीच प्रशंसनीय बाब आहे. महानगरपालिका प्रशासन गेल्या अनेक वर्षापासून कंत्राटी तत्वावर परिचारिकांची भरती करून त्यांच्याकडून काम करवून घेत आहे. सहा महिने काम करवून घ्यायचे आणि सहा महिने पूर्ण होताना दोन-तीन दिवसाचा ब्रेक देवून त्यांना कामावर पुन्हा रूजू करून घ्यायचे असा प्रकार आरोग्य विभागाकडून सुरू आहे. परंतु ज्यावेळी महापालिका प्रशासन परिचारिकांच्या कायम जागेकरता भरती प्रक्रिया सुरू होते, त्यावेळी कंत्राटी स्वरूपात काम करणार्या व महापालिकेच्या आरोग्य विभागातील रूग्णालयीन सेवेचा प्रत्यक्ष अनुभव असणार्या या परिचारिका डावलून अन्य परिचारिकांना कामावर घेतले जाते. काम करणार्या कंत्राटी परिचारिकांना नवीन परिचारिकांसमवेत पुन्हा लेखी परिक्षा देणे महापालिका प्रशासन भाग पाडते. ज्यांना आपल्या रूग्णालयाचा, आरोग्य सुविधांचा प्रत्यक्ष अनुभव आहे अशा कंत्राटी परिचारिकांना पालिका प्रशासनाने खर्या अर्थांने कायम सेवेत प्राधान्याने भरती करून घेणे आवश्यक आहे. परंतु महापालिका प्रशासन प्रॅक्टिकलपेक्षा थेअरीला अधिक महत्व देत असल्याने कंत्राटी परिचारिकांवर आजवर अन्याय झाला आहे. यातून तत्कालीन महापालिका आयुक्त सुनील सोनी यांच्या काळात 18 जानेवारी 2003 ला 81 परिचारिकांची भरती करताना तत्कालीन परिस्थितीत काम करणार्या कंत्राटी परिचारिकांवर प्रशासनकडून अन्यायच झालेला असल्याचे नामदेव भगत यांनी निवेदनात म्हटलेे आहे.
आजही महापालिका प्रशासनातील आरोग्य विभागात परिचारिकांची संख्या कमीच आहे. महापालिका प्रशासनाला दर्जेदार व सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकरता लवकरच परिचारिकांची भरती करावी लागणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने यापुढे कंत्राटी तत्वावर परिचारिकांची भरती न करता कायम तत्वावर परिचारिकांची भरती करावी आणि सद्य:स्थितीत कंत्राटी तत्वावर काम करणार्या परिचारिकांची सेवा प्रथम कायम करण्याची लेखी मागणी नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.