मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाला हल्ल्याची धमकी देणारा फोन आल्यानंतर विमानतळावर अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला असून, विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास विमानतळ व्यवस्थापकाला हल्ल्याची धमकी देणारा निनावी फोन आला होता. हा निनावी फोन कुठून आला होता त्याची पोलिसांना माहिती मिळाली आहे मात्र पोलिसांनी अद्याप हा फोन अफवा असल्याचे जाहीर केलेले नाही असे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्या वीणा चिपळूणकर यांनी सांगितले.
या फोननंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फोन करणार्याने फक्त विमानतळच नाही तर, ताज हॉटेललाही लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे.
या फोननंतर विमानतळावर मोठया प्रमाणावर शोध मोहिम आणि तपासणी करण्यात येत आहे. बॉम्ब शोधक पथकही तैनात करण्यात आले आहे.
पोलिस उपायुक्त विरेंद्र मिश्रा यांनी माहिती देताना सांगितले की, ही धमकी निश्चित स्वरुपाची होती. फोन करणार्याने त्याची माहितीही दिली. त्यामुळे खबरदारी म्हणून विमानतळावर अतिरिक्त सुरक्षा उपायोजना करण्यात येत आहेत. फोन करणार्याने तो अंधेरीचा रहिवाशी असल्याचे सांगितले.