नवी मुंबई : सीबीडी, सेक्टर-१५ येथील खाडीकिनारी ‘सिडको’तर्फे पर्यावरणाचे संवर्धन करुन सर्व सुखसुविधांनी युक्त असा मरीना प्रकल्प साकारला जाणार आहे. भविष्यात होणार्या महाराष्ट्रातील एका सुंदर आणि अभिनव अशा या मरीना प्रकल्पाला गोवर्धनी मरीना प्रकल्प असे नाव देण्यात यावे, अशी मागणी ‘बेलापूर’च्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
‘सिडको’तर्फे सीबीडी, सेक्टर-१५ खाडीकिनारी मरीना प्रकल्प उभारला जात असून या मरीना प्रकल्पाला नवी मुंबईकर नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवाय एक चांगला प्रकल्प म्हणून या प्रकल्पाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यातच सदर मरीना प्रकल्प ज्या परिसरात उभारला जात आहे, त्या परिसरात बेलापूरची ग्रामदेवता गोवर्धनी मातेचे मंदीर आहे. सदर मंदिर बेलापूर येथील ब्राम्हण, सोनार, आगरी, कोळी आदि ग्रामस्थांची कुलदेवता आहे. गोवर्धनी मातेचे मंदीर पुरातन असून ते पेशवेकालीन आहे. या मंदिराशेजारी पेशवेकालीन किल्ला आहे. कसईच्या किल्ल्याचे प्रमुख जोशी यांनी बेलापूर किल्ल्यातून वसई किल्ल्याच्या लढाईचा तह केल्याचा इतिहास आहे. त्यामुळे अशा ऐतिहासिक वारसा असलेल्या गोवर्धनी मातेचे नाव मरीना प्रकल्पाला देण्यासाठी आ. मंदाताई म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.
यासंदर्भात आ. मंदाताई म्हात्रे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना नुकतेच पत्र दिले असून त्यात त्यांनी सीबीडी-बेलापूर खाडीकिनारी लवकरच उभारल्या जाणार्या मरीना प्रकल्पाचे गोवर्धनी मरीना प्रकल्प असे नामकरण करण्याची मागणी केली आहे.