मुंबई – प्रसिध्द संगीत दिग्दर्शक आणि गीतकार रवींद्र जैन यांचे शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास मुंबईच्या लिलावती रुग्णालयात निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते.
मागच्या काही दिवसांपासून ते मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते. रवींद्र जैन यांच्यावर प्रारंभी नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात उपचार सुरु होते. बुधवारी त्यांनी हवाई रुग्णवाहिकेने मुंबईत आणल्यानंतर बांद्रयाच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रवींद्र जैन यांची मागच्या काही दिवसांपासून प्रकृती खराब होती. लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. प्रकृती खराब असूनही शब्द मोडू नये यासाठी नागपूरला एका संगीत कार्यक्रमासाठी गेले होते. खराब प्रकृतीमुळे त्यांना या कार्यक्रमात सहभागी होता आले नाही.
अखेर त्यांना तेथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिकच ढासळल्यानंतर त्यांना हवाई रुग्णवाहिकेने मुंबईत आणण्यात आले. राम तेरी गंगा मैली, दो जासूस, हीना या गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते. ८० ते ९० च्या दशकात जैन यांनी चित्रपटांबरोबर अनेक पौराणिक आणि अन्य मालिकांनाही संगीत दिले होते.