नवी मुंबई ः शैक्षणिक वापराच्या भूखंडावर रूग्णालय सुरू केल्याप्रकरणी महापालिका आणि ‘सिडको’ने नेरुळ येथील तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची चौकशी सुरू केली आहे. याकरिता संस्थेला नोटिस बजावून आवश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या संदर्भात ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना’च्या पदाधिकार्यांनी ‘सिडको’च्या सह-व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांच्याकडे तेरणा पब्लिक ट्रस्टने केलेल्या शैक्षणिक वापरासाठी राखीव भूखंडाच्या गैरव्यवहाराची तक्रार केली होती. तर महापालिकेची दिशाभूल करुन तेरणा संस्थेने खाजगी रुग्णालयाशी भागिदारी करुन तेरणा सह्याद्री रुग्णालय बेकायदेशीरपणे स्थापन केल्याची तक्रार नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडे ‘मनविसे’तर्फे करण्यात आली होती.
तेरणा संस्थेला नोटिस बजावल्यामुळे सविनय म्हात्रे यांनी ‘सिडको’चे तसेच महापालिकेच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. तर दुसरीकडे सदर प्रकरणात महापालिका जनतेला मुर्ख बनवत असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. रुग्णालय नोंदणीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर नियमाप्रमाणे एक महिन्यात वैद्यकीय आरोग्य अधिकार्यांनी सर्व कागदपत्रे तपासून तेरणा संस्थेला रुग्णालय सुरु करण्याची परवानगी देणे बंधनकारक असताना आरोग्य विभाग आता ८ वर्षांनंतर तेरणा सह्याद्री रुग्णालयास कागदपत्रे सादर करण्याची नोटिस काढते. यावरुनच महापालिकेचा आरोग्य विभाग किती बेजबाबदार आहे, याचा प्रत्यय येतो.
सदर प्रकरणाची महापालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन तेरणा-सह्याद्री रुग्णालयाची नोंदणी रद्द करुन खोटी आणि अपूर्ण कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा. तसेच या प्रकरणातील संबंधित दोषी अधिकार्यांचे निलंबन करण्याची मागणी सविनय म्हात्रे यांनी केली आहे.
नेरूळ, सेक्टर-२२ येथील १२ क्रमांकाचा भूखंड तेरणा सह्याद्री रूग्णालयाबाबत ‘मनविसे’चे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी महापालिका आणि सिडकोकडे तक्रार केली होती. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेने शैक्षणिक वापराच्या भूखंडावर खाजगी रूग्णालय सुरू केले असून आरोग्य विभागाकडे आवश्यक कागदपत्रे जमा केलेली नसल्याचाही सविनय म्हात्रे यांनी आरोप केला होता. यासाठी म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेवून तेरणा संस्थेच्या चौकशीची मागणी केली होती. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला सदर भूखंड शैक्षणिक वापरासाठी ‘सिडको’कडून देण्यात आला असतानाही या भूखंडावर तेरणा संस्थेने अवैधपणे खाजगी रुग्णालय उभे केल्याची तक्रार सविनय म्हात्रे यांनी ‘सिडको’कडे केली होती. शिवाय महापालिकेच्या आरोग्य विभागाने तेरणा रुग्णालयास परवानगी देताना कोणतीच कागदपत्रे तपासली नसल्याचा आरोपही सविनय म्हात्रे यांनी महापालिका आयुक्तांकडे दिलेल्या पत्रात केला होता. त्यामुळे या प्रकरणात बेजबाबदार असलेल्या आरोग्य अधिकार्यांचे निलंबन करण्याची मागणी म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली होती.
तसेच नेरुळ, सेक्टर-२२ येथील १२ क्रमांकाच्या (१०,५०० चौरस मीटर) भूखंडावर कोणतेच बांधकाम तेरणा संस्थेने केले नसल्याने सदर भूखंड ‘सिडको’ने परत घेण्याची मागणी सविनय म्हात्रे यांनी ‘सिडको’च्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांच्याकडे केली होती. सदर दोन्ही प्रकरणात मोठा गैरव्यवहार असल्याबाबत सविनय म्हात्रे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच ‘सिडको’ने तेरणा सह्याद्री ट्रस्टला नोटीस बजावली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात संस्थेने असमर्थता दर्शवली आहे. त्यासाठी त्यांनी एक महिन्याची मुदत मागितली असून त्यांना ती दिल्याचे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक परोपकारी यांनी सांगितले.