हरेश साठे
पनवेल : भाजपची विचारसरणी कायमच देशाच्या विकासाबद्दलची राहिली आहे. देश पहिल्यांदा, मग पक्ष आणि त्यानंतर स्वतःचा विचार, असा भाजपचा विकासाचा मंत्र आहे. त्यामुळे तुम्ही सार्यांनीदेखील सदैव देशाचा आणि देशसेवेचा विचार करा, असा संदेश आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला.
भारतीय जनता पक्षाच्या तळोजा फेज 1 येथील जनसंपर्क कार्यालयाचे नुकतेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या उद्घाटन समारंभास भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष तानाजी खंडागळे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कदम, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम, किशोर चौतमोल, दशरथ म्हात्रे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रल्हाद केणी, ताहिर पटेल, मुनाफ पटेल, निर्दोष केणी व त्यांच्या सहकार्यांनी केले होते.
कार्यकर्त्यांनी जागरूकतेने वागले पाहिजे. अनेकदा ग्रामीण जनता शासकीय यंत्रणेला दोष देत असते. त्याचे कारण आपण ठरता कामा नये. सरकारी योजना व इतर विकासकामे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याची तयारी दाखवा आणि त्यानुसार कार्यरत राहा, असे ते म्हणाले.
आधीच्या सरकारला टोला लगावत आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, त्या सरकारची विचारसरणी भिन्न होती. ते आधी स्वतःचा, मग पक्षाचा आणि वेळ मिळाला तर देशाचा विचार करायचे. अशा वृत्तीमुळे देश खूप मागे पडला. आज भारताला देशात जो मानसन्मान प्राप्त होतो, त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकार्यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे आता विकसनशील देशांमध्ये सर्वात जलद विकास हा आपल्या भारताचा होत आहे. आपण सर्वांनी त्यांना साथ देऊ या, असे आवाहनही आमदार ठाकूर यांनी केले.
****
कार्यकर्त्यांनो, आपल्या कार्याचा सुगंध प्रत्येक घरात दरवळला पाहिजे असे कार्यरत राहा म्हणजे जनसंपर्क कार्यालयाचे सार्थक होईल. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून मुस्लीम बांधवही भाजपच्या जवळ आले आहेत. त्यामुळे आता तळोजाचा विकास सर्वांच्या सहकार्याने होणारच.
-बाळासाहेब पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष