मुंबई : मुंबईत आजपासून नवरात्रोत्सवाच्या धामधुमीला सुरुवात झालीय. यामुळे हजारो मुंबईकर उत्सवाकरता सज्ज झालेत पण याचाच फायदा घेऊन दहशतवादी मुंबईला टार्गेट करण्याच्या तयारीत आहेत, असा एक गुप्त अहवाल मुंबई पोलिसांनी जारी केलाय. एव्हढच नाही तर पुण्यात फरासखाना येथे झालेल्या बॉम्बस्फोटासारखा स्फोट मुंबईतही होऊ शकतो, अशी शक्यता मुंबई पोलिसांच्या गुप्त अहवालात व्यक्त करण्यात आलीय. त्यामुळे उत्सवादरम्यान मुंबईकरांनो सावधानता बाळगा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय.
मुंबईत ठिकठिकाणी नवरात्रौत्सवावर मुंबईकर दांडिया रास खेळून आणि देवीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावून साजरा करतायत. नवरात्रीत मुंबईमध्ये बाजारात खरेदी करण्याकरता मोठी गर्दी होते. पण, अशाच गर्दी फायदा दहशतवादी घेऊन मुंबईत घातपात घडवण्याच्या तयारीत आहेत, असा अहवाल मुंबई पोलिसांच्या गुप्त अहवालात समोर आलीय.
10 जुलै 2014 रोजी पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनसमोर झालेल्या बॉम्बस्फोटासारखा बॉम्बस्फोट मुंबईत घडवण्याची शक्यता आहे, असं अधोरेखित करुन त्यादृष्टीने मुंबईत चोख बंदोबस्त ठेवावा, असे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आलेत.
पण हा बॉम्बस्फोट म्हणजे नवीन स्लीपर सेलचा एक फसलेला प्रयत्न असून, आता हा स्लीपर सेल मोठा धमाका करु शकतो, असे निर्देश मुंबई पोलिसांना देण्यात आलेत. शिवाय सॉफ्ट टार्गेट म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातूनही पुरुषांचे आक्षेपार्ह फोटो आणि मजकूर टाकून मुंबईत तणावपूर्ण वातावरण निर्मिती केली जाण्याची शक्यताही बळावल्याचं यात नमूद करण्यात आलंय.
मुंबई तशी 25 तास 365 दिवस दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असते. पण, अशा उत्सवात दहशतवादी कृत्य करुन निष्पाप लोकांचा बळी घेणं तसं दहशतवाद्यांना सोपे असते. पण, अशा कृत्यांना आळा घालायचा असेल तर मुंबईकरांनो तुम्ही सावधान रहा. तुमच्या आजुबाजुला कोणती संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसली तर तात्काळ पोलिसांना कळवा. कारण मुंबईकर तुम्ही सावधान राहिलात तर मुंबई सुरक्षित राहील.