नवी मुंबई : रस्त्यावरील नवरात्रौत्सवाला व दांडीयाला न्यायालयाने बंदी घातली असली तरी नेरूळ नोडमधील युवकांची दांडिया खेळण्याची इच्छा आई वत्सला प्रतिष्ठान आयोजित नवरात्रौत्सवामध्ये पूर्ण होत असल्याने नेरूळ नोडमध्ये या दांडीयाचे आकर्षण युवा वर्गामध्ये कमालीचे वाढीस लागले आहे.
नेरूळ सेक्टर 12 येथील तेरणा विद्यालयाच्या क्रिडांगणावर गेल्या तीन वर्षापासून आई वत्सला प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. सिडकोचे माजी संचालक व शिवसेना नगरसेवक नामदेव भगत हे आई वत्सला प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांच्या आणि माजी नगरसेविका इंदूमती भगत यांच्या मार्गदर्शनाखाली या नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षी नवरात्रौत्सवामध्ये दांडीया-गरबासोबत विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही आई वत्सला प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
यंदा रस्त्यावरील नवरात्रौत्सव व दांडीया न्यायालयीन आदेशामुळे बंद झाल्याने दांडीयाप्रेमी व गरबाप्रेमींची निराशा झाली आहे. तथापि नेरूळ पश्चिमेला तेरणाच्या विशाल क्रिडांगणावर आई वत्सला प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित नवरात्रौत्सवामध्ये दांडीया व गरबा असल्याने युवा वर्गाची पाऊले अनायचे तेरणाच्या क्रिडांगणावरील आई वत्सला प्रतिष्ठानच्या नवरात्रौत्सवाकडे वळू लागली आहे. तरूणाईला आकर्षित करणारी गाणी असल्याने तरूणाई दांडीचा आस्वाद घेताना या ठिकाणी पहावयास मिळत आहे. देवीच्या दर्शनासाठी सकाळी व संध्याकाळी महिला वर्गाची गर्दीही या ठिकाणी पहावयास मिळत आहे.