रायगड : रायगड जिल्ह्यात वाळू माफियांकडून अधिकार्यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी यापुढे पोलीस आणि महसूल प्रशासन संयुक्तरित्या मोहीम हाती घेणार आहे. त्याचबरोबर अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी वाहनांचा व चालकाचा परवाना रद्द करण्याबाबतच प्रस्ताव आरटीओकडे पाठविण्यात येणार आहे.
संक्शन पंपाने वाळू उत्खननावर बंदी असताना रायगड जिल्ह्यात राजरोसपणे बेकायदा वाळू उत्खनन केले जाते. यावर प्रतिबंध आणण्यासाठी महसूल विभागाची यंत्रणा तोकडी पडते. त्यातच महसूल विभाग आणि पोलीस खात्यात समन्वयाचा अभाव आहे. त्यातून अनेकदा अवैध वाळू वाहतूक रोखणार्या महसूल विभागाच्या अधिकार्यांवर हल्ले होण्याचे प्रकार घडतात.
गेल्या सहा महिन्यात वाळू माफियांकडून हल्ल्याचे तीन प्रकार घडले. हे प्रकार रोखण्यासाठी यापुढे पोलीस आणि महसूल विभागातर्फे संयुक्त कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी दिलीय.
गेल्या पाच महिन्यांत जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाची एकूण 113 प्रकरणे दाखल झाली. त्यापैंकी 106 प्रकरणात 45 लाख 23 हजार 105 रूपये दंड आकारण्यात आला. तर अवैध वाळू वाहतुकीच्या 74 प्रकरणात 9 फौजदारी गुन्हे दाखल करून 24 जणांना अटक करण्यात आली. यात 15 लाख 52 हजार 147 रुपये इतकी दंडवसुली करण्यात आली. असे असले तरी अवैध वाळूची वाहतूक रोखण्यात ना पोलिसांना यश आले ना महसूल यंत्रणेला.
ही बाब लक्षात घेवून आता अवैध वाळूची वाहतूक करणारी वाहने आणि ती वाहने चालवणारे चालक यांचे परवानेच रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिसांकडून आरटीओला पाठविण्यात येणार आहे. पोलिसांच्या या भूमिकेचं अनेकांनी स्वागतच केलंय. यामुळे अवैध वाळू वाहतुकीला आळा बसेल असा पोलिसाचा विश्वास आहे.