नवी मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सत्ता असून शिवसेना विरोधी पक्षात आहे. सत्ताधार्यांचे सुकाणू महापौरपदावरून सुधाकर सोनवणेंसारखा स्वच्छ चारित्र्याचा सालस माणूस सांभाळत असून शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदाची धुरा विजय चौगुलेंच्या हाती सोपविली आहे. एककाळ असा होता की, शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदावरून विजय चौगुले हे आक्रमकपणे शिवसेना संघटनेची बांधणी करत होती आणि दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्र्र्रेसमध्ये संघटनाबांधणीप्रती कमालीची उदासिनता होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष गोपीनाथ ठाकूर हे अधिकांश लोकांना माहितीदेखील नव्हते. पण मधल्या काळात पुलाखालुन बरेच पाणी वाहून गेल्याने राजकीय स्थिंत्यंतरे नवी मुंबईत पहावयास मिळाली. मोदी लाटेमुळे नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेश नाईकांना १४०० मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. फारशी संघटना बांधणी नसणार्या भाजपाने मंदाताई म्हात्रेंच्या रूपाने महाराष्ट्राला बेलापुरातून आमदार दिला. विधानसभा निवडणूकीत ऐरोली व बेलापुर मतदारसंघात शिवसेना दुसर्या तसेच तिसर्या क्रमाकांवर फेकली गेली. आज शिवसेना संघटनेला गेल्या आठ महिन्यापासून जिल्हाप्रमुख नियुक्त करता आलेला नाही. जिल्हाप्रमुखपद अनेक महिने रिक्त असताना व विना जिल्हाप्रमुखाच्या शिवसेनेला नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका लढवाव्या लागल्या असतानाही मातोश्रीवरून नवी मुंबईची फारशी दखल घेतली जात नसल्याचे उभ्या महाराष्ट्राला एव्हाना पहावयास मिळाले आहे. दुसरीकडे महापालिका निवडणूकीत मिळालेल्या यशानंतर नवी मुंबई कार्यक्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस नव्याने कात टाकताना पहावयास मिळत आहे. पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी अनंत सुतारांसारखा दमदार, कसदार आणि खमक्या माणसाला निवडण्यात आले आहे. महिला जिल्हाध्यक्षपदी शिरवणेच्या सौ. माधुरी सुतारांना निवडण्यात आले आहे. युवकच्या जिल्हाध्यक्षपदी कुकशेतचा ढाण्या वाघ म्हणून नवी मुंबईच्या राजकारणात ओळखल्या जाणार्या सुरज पाटीलची वर्णी लागली आहे. नुकताच वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहामध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात लोकनेते गणेश नाईक यांनी केलेले मार्गदर्शन पाहता व पक्षाची स्पष्ट केलेली संभाव्य रूपरेषा पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेसची पक्षबांधणी कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात पहावयास मिळणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. पक्षाच्या तालुकाध्यक्षपदीदेखील तितकीच दमदार व कसदार माणसे निवडण्यात येवू लागली आहे. मनसेदेखील गजाजन काळेंच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकवार नावारूपाल येण्यासाठी परिश्रमाची शिकस्त करू लागली आहे. पण शिवसेनेचे काय हा प्रश्न पुन्हा एकवार उपस्थित होत आहे. ऍड. मनोहर गायखे, नामदेव भगत, विजय माने, एम.के.मढवी यांच्यासह विविध रथी-महारथी मंडळी असतानादेखील जिल्हाध्यक्षपद आणखी काही काळ रिक्त ठेवणे पक्षाला परवडणारे नाही. विजय नाहटाची शिवसैनिकांवरील पकड कमी होवू लागली आहे. पक्षाचे उपनेते असताना नाहटांचा फक्त आणि फक्त बेलापुर विधानसभा मतदारसंघातील वावर शिवसैनिकांमध्ये चर्चेचा विषय बनू लागला आहे. खासदार राजन विचारेंचे नवी मुंबईत जनसंपर्क कार्यालय नसल्याने व नवी मुंबईकरांना खासदारांना फारसे दर्शन होत नसल्याने विरोधकांकरता हा विषय आयते कोलित होवून बसला आहे. भाजपा, मनसे, शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने गेल्या काही महिन्यापासून पक्षबांधणीवर विशेष लक्ष दिल्याचे पहावयास मिळत आहे. लोकनेते गणेश नाईक हे तळागाळातल्या कार्यकर्त्यांना व जनसामान्यांना सहजासहजी उपलब्ध होवू लागल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. बेलापुर विधासनभा मतदारसंघातील पराभवाचे शल्य कार्यकर्त्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. मोदी लाटेमुळे १४०० मतांनी झालेल्या निसटत्या पराभवाची परतफेड दणदणीत विजयाने करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांना व पदाधिकार्यांकडून बोलला जावू लागला आहे.