नवी मुंबई: नेरुळ रेल्वे स्थानकात भिक मागण्यासाठी गेलेल्या एका ८ वर्षीय मुलीला अज्ञात तरुणाने जबरदस्तीने उचलून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नेरुळ पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात तरुणाविरोधात बलात्कारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु आहे. दरम्यान, पिडीत मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या तरुणाने अंधाराचा फायदा उचलत लैंगिक अत्याचार केल्याने त्याचा शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत.
या घटनेतील पिडीत ८ वर्षीय मुलगी नेरुळ मधील झोपडपट्टीत रहावयास असून २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ती नेरुळ रेल्वे स्थानकावर भिक मागण्यासाठी गेली होती. रात्री उशीरापर्यंत सदर मुलगी रेल्वे स्थानकावर थांबली असताना, एका अज्ञात तरुणाने पिडीत मुलीला जबरदस्तीने रेल्वे रुळालगत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. सदर प्रकार मध्यरात्री
उशीरापर्यंत सुरु होता. पिडीत मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या तरुणाने पिडीत मुलीला त्याच ठिकाणी सोडून पलायन केल्यानंतर सदर मुलीने पहाटे ४ च्या सुमारास आपले घर गाठले. त्यानंतर तिने आपल्या आईला घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने नेरुळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात तरुणाविरोधात बलात्कारासह पोक्सो कायद्यानुसार गु्न्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु आहे.