नवी मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या महिलांचे हक्क व कल्याण समितीने आज नवी मुंबई महानगरपालिकेस भेट देऊन महिला कल्याण विषयक कामांचा आढावा घेतला. समिती प्रमुख विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मनिषा अशोक चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, विधानसभा सदस्य आमदार डॉ. भारती लव्हेकर, विधानसभा सदस्य आमदार श्रीम. दिपीका चव्हाण, विधानपरिषद सदस्य आमदार श्रीम. स्मिता वाघ, विधानपरिषद सदस्य आमदार श्रीम. विद्या चव्हाण, विधानपरिषद सदस्य आमदार हुस्नबानु खलिफे, समितीचे सदस्य सचिव विलास आठवले या समिती सदस्यांनी याप्रसंगी महानगरपालिकेच्या महिला सदस्यांशी चर्चा केली व महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या कामकाजाविषयी माहिती घेतली. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका महिलांचे हक्क व कल्याण या विषयी करीत असलेल्या कामांचा आढावा घेतला आणि मौल्यवान सूचना केल्या. नवी मुंबई हे आधुनिक शहर असून स्मार्ट सिटीसाठी निवड झालेले शहर आहे. त्यामुळे नवी मुंबईकडून मोठ्या अपेक्षा असून महिला कल्याणविषयक अधिक चांगले काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, सभागृह नेते जयवंत सुतार, महिला व बालकल्याण समिती सभापती अपर्णा गवते, आरोग्य समिती सभापती पुनम पाटील यांच्या हस्ते समिती प्रमुख व सदस्यांचे स्वागत करण्यात आले.