सातारा : बिगर शेती प्रस्ताव अनुकूल करण्यासाठी २० हजार रुपयाची लाच स्वीकारणार्या तत्कालीन खंडाळा तहसीलदार सुप्रिया सुभाष बागवडे यांना लाच लुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७ नुसार ३ वर्ष सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद तसेच कलम १३ (१) (ड) सह १३ (२) खाली ३ वर्ष सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद अशी शिक्षा विशेष न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश श्रीमती व्ही.एम. मोहिते यांनी आज (बुधवार) सुनावली.
मुळ तक्रारदार यांनी सप्टेंबर २०१० मध्ये मौजे पारगाव येथील जमीन गट क्र.९३३ मधील २८ गुंठे क्षेत्र खरेदी केले होते. त्या अनुषंगाने बिगर शेती प्रस्ताव अनुकूलरीत्या अभिप्रायाने जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे पाठविण्यासाठी तत्कालीन खंडाळा तहसीलदार सुप्रिया बागवडे यांनी २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत ऍन्टी करप्शन ब्युरोने पंचासमोर पडताळणी करून तक्रार २ सप्टेंबर २०११ रोजी नोंदवून सापळा रचला. यामध्ये तक्रारदाराकडून शासकीय पंचासमक्ष २० हजार रुपये लाच स्वीकारताना श्रीमती बागवडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानंतर तिच्याविरुद्ध खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांनी करून विशेष न्यायालयात २७ मे २०१३ रोजी दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्याची सुनावणी आज होऊन आरोपी लोकसेवक श्रीमती सुप्रिया सुभाष बागवडे, तहसीलदार खंडाळा यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७ नुसार ३ वर्ष सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद अशी शिक्षा विशेष न्यायाधीश श्रीमती व्ही.एम. मोहिते यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता शामप्रसाद बेगमपुरे यांनी कामकाज पाहिले.