नवी मुंबई : महिला सक्षमीकरणामध्ये सिडकोचे नेहमीच मोठे योगदान राहिले आहे. गणेशपुरी गावातील मत्स्य व्यवसाय करणार्या व मत्स्य व्यवसाय करू इच्छिणार्या महिलांसाठी सिडको व आयएल एन्ड एफएस संस्थेमार्फत ‘मासे व मत्स्यप्रक्रिया’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी दिनांक २७ ऑक्टोबर २०१५ रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
मत्स्यव्यवसाय हा केवळ मासेमारीपुरता मर्यादित राहिला नसून तो आता बहुआयामी बनला आहे. मासे टिकवणे, त्यांची निर्यात करणे, सुक्या मासळीचा व्यवसाय, माशांपासून विविध पौष्टिक पदार्थ बनवून खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणे असे मत्स्यव्यवसायाचे अनेक पैलू आहेत. मच्छिमार महिलांना या व्यवसायांबद्दल माहिती असते. परंतु त्यात आणखीन कोणते नवे प्रयोग करता येतील किंवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसायातील फायदा कसा वाढवता येईल याचे मार्गदर्शन महिलांना व्हावे या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली होती.
‘सेन्ट्रल फिशरीज इन्स्टिट्यूट एन्ड एज्युकेशन’ या केंद्रशासनाच्या संस्थेमधील तज्ञ मंडळींनी या कार्यशाळेत महिलांना मार्गदर्शन केले. शास्रज्ञ डॉ.अमजद बलांगे व त्यांचे सहकार्यांनी माशांवर विविध प्रक्रीया करून त्याचे विविध पदार्थ तयार करण्याची प्रात्यक्षिके दाखवली. त्याचप्रमाणे मासे टिकवण्याच्या व्यवसायावरदेखील डॉ. बलांगे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यात त्यांनी मत्स्य व्यवसायाचे मूल्यवर्धन कसे करावे, कमी किमतीच्या माशांपासून उत्तम, टिकाऊ व पौष्टिक पदार्थ कसे तयार करावेत या संबंधीची माहिती सांगितली. कोलंबीचे लोणचे, कटलेट, माशांपासून वडे इत्यादी पदार्थाचे प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच हे पदार्थ दीर्घकाळ टिकविण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याबद्दल माहिती दिली.
गणेशपुरी गावातील महिलांनी या कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद दिला. त्यांनी उत्साहाने प्रात्यक्षिकामध्ये सहभाग घेऊन विविध प्रकारची माहिती मिळवली. त्याचप्रमाणे प्रश्नोत्तर सत्रामध्ये महिलांनी विचारलेल्या शंकांचे तज्ञ मंडळींनी निरसन केले. या कार्यशाळेत सुमारे ४५ महिला सहभागी झाल्या होत्या. हि कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न व्हावी यासाठी ग्रामसेविका व स्थानिक महिला प्रतिनिधी यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यशाळेतून प्रोत्साहन घेऊन गणेशपुरी गावातील महिलांनी अर्बन हाट, बेलापूर येथे सुरु झालेल्या आर्ट व क्राफ्ट प्रदर्शनामध्ये माशांपासून तयार खाद्यपदार्थांचा विक्री स्टॉल सुरु केला आहे. या स्टॉलमध्ये जवळा चटणी, सुका जवळा, बांगडा फ्राय , कोळंबी फ्राय,तांदूळ भाकरी इ. पदार्थांची विक्री करण्यात येत आहे.