कंत्राटी कामगारांकरता नगरसेवक नामदेव भगतांची मागणी
नवी मुंबई : दिवाळी आता अवघ्या आठवड्यावर आलेली असतानाच सिडकोचे माजी संचालक व शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी महापालिका प्रशासनात काम करणार्या कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचे वेतन देण्याची महापालिका आयुक्तांकडे लेखी मागणी केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनात मनपा स्थापनेपासून कंत्राटी कामगार काम करत असून कायम कामगारांच्या तुलनेत कंत्राटी कामगारांची संख्या दुपटीहून अधिक आहे. कंत्राटी कामगारांच्या परिश्रमामुळे आपल्या महापालिकेस संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात राज्यामध्ये प्रथम क्रमाकांचे दोन वेळा पारितोषिक मिळाले होते, हे आपणास विसरून चालणार नाही. नवी मुंबईकरांना नागरी सुविधा पुरविण्याचे आणि नवी मुंबईकरांच्या नागरी समस्या सोडविण्याचे महत्वपूर्ण काम कंत्राटी कामगारांच्या माध्यमातूनच आजही केले जात आहे. दिवाळी आता अवघ्या आठवड्यावर आली असून महापालिकेच्या कायम कामगारांना १५ हजार रूपये बोनस मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. पण कंत्राटी कामगारांच्या बोनसचे काय? समान कामाला समान वेतन ही घोषणा आजही केवळ कागदोपत्रीच राहीली असून कंत्राटी कामगारांना आजही तुटपुंज्या वेतनावरच काम करावे लागत आहे. एकीकडे कायम कामगार दिवाळी बोनस म्हणून पालिका प्रशासनाकडून १५ हजार रूपये घेत असताना कंत्राटी कामगारांच्या हातावर जेमतेम पाच ते सहा हजार रूपये दिवाळी बोनस म्हणून टेकविले जाणार, हे चित्र या शहराला भूषणावह नाही आणि कंत्राटी कामगारांच्या परिश्रमाला शोभनीय नसल्याची नाराजी शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.
दिवाळी आता जेमतेम पाच ते सहा दिवसावर आलेली असल्याने कंत्राटी कामगारांना किमान एक महिन्याचे वेतन बोनस म्हणून पालिका प्रशासनाने द्यावेत, तसेच कंत्राटी कामगारांच्या वेतनास दोन ते तीन महिने विलंब होत असताना माणूसकीच्या नात्याने त्यांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचे वेतन देण्याबाबत आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी नामदेव भगत यांनी केली आहे.