नवी मुंबई : आधुनिक शहराकडून नवी मुंबईची स्मार्ट सिटीकडे गतीमान वाटचाल सुरु असताना स्मार्ट सिटी निर्मितीत नागरिकांच्या संकल्पना-सूचना यांचा प्रामुख्याने समावेश असावा याकरीता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी वॉकथॉन मध्ये २७ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होत आम्ही सर्व नवी मुंबईकर नागरिक मिळून नवी मुंबईला स्मार्ट सिटी बनविणारच असा निर्धार व्यक्त केला. करावे नेरुळ येथील गणपतशेठ तांडेल प्रदर्शनी मैदानात आयोजित स्मार्ट सिटी वॉकेथॉन उपक्रमाप्रसंगी विद्यार्थी व नागरिकांची विक्रमी उपस्थिती होती.
याप्रसंगी महापौर सुधाकर सोनवणे यांचेसह उपस्थितांनी स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली. यावेळी व्यासपिठावर ऐरोली विधानसभा सदस्य आमदार संदीप नाईक, बेलापूर विधानसभा आमदार मंदाताई म्हात्रे, विधानपरिषद सदस्य नरेंद्र पाटील, उपमहापौर अविनाश लाड, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, स्थायी समिती सभापती सौ. नेत्रा शिर्के, सभागृह नेता जयवंत सुतार, आरोग्य समिती सभापती सौ. पुनम पाटील, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, विनोद म्हात्रे, सुनिल पाटील, लिलाधर नाईक आणि इतर महापालिका अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
सकाळी ७ वाजल्या पासून अत्यंत शिस्तबद्ध रितीने विद्यार्थी कार्यक्रम स्थळी येत होते व आपल्याला नेमून दिलेल्या जागी शिक्षकांच्या सहकार्याने रांगेत उभे राहत होते. यावेळी कलर्स चित्रवाहिनीवरील इंडीया गॉट टॅलेंट या गाजलेल्या स्पर्धेचे विजेते जोसेफ ब्रदर्स यांनी स्त्री आत्मसन्मान आणि सक्षमीकरण, एकात्मता या विषयांवर रॅप म्युझिकल गीते सादर केली. त्याचप्रमाणे नवी मुंबई इज द बेस्ट सारी दुनियाको बताना है, नवी मुंबई जैसा हमे पुरे दुनियाको बनाना है अशा शब्दात नवी मुंबई इज द स्मार्ट सिटी हे रॅप सॉंग सादर केले. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमवेत उत्स्फुर्तपणे सूर धरत आय एम स्मार्ट – आय एम नवी मुंबई असा जयघोष केला.
डि.ए.व्ही. पब्लिक स्कुल, नेरुळच्या विद्यार्थ्यांनी सामुहिक राष्ट्रगीत गायन केले तसेच मार्चपास केले. नवी मुंबई महानगरपालिका शाळा करावे येथील विद्यार्थ्यांनी पारंपारीक लेझीम सादरीकरण करत एन.एम.एम.सी. ही अक्षरे अभिनव लेझीम रचनेतून निर्माण केली. वॉकेथॉन ज्योतीचे मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन करण्यात आले तसेच ५००० हजारहून अधिक फुग्यांव्दारे स्मार्ट नवी मुंबई चॅलेंजचे संदेश फलक हवेत सोडण्यात आले.
महापौर सुधाकर सोनवणे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून स्मार्ट सिटी वॉकेथॉनला प्रारंभ झाला. महापौरांसह सर्वच मान्यवरांनी वॉकेथॉनमध्ये सक्रीय सहभाग घेतला. १४ हजाराहून अधिक विद्यार्थी बेलापूरच्या दिशेने वॉकेथॉनमध्ये सहभागी झाले तसेच १३ हजाराहून अधिक विद्यार्थी नेरुळच्या दिशेने वॉकेथॉनमध्ये सहभागी झाले.
अशाप्रकारे २७ हजाराहून अधिक विद्यार्थी आणि नागरिक यांच्या सहभागाने यशस्वीरित्या संपन्न झालेल्या या विक्रमी उपक्रमातून नवी मुंबई स्वच्छ व स्मार्ट बनविण्याचा संदेश मोठ्या प्रमाणावर प्रसारीत करण्यात आला. तसेच नागरिकांहीं http://mygov.in/group-issue/
नवी मुंबईचे उद्याचे भविष्य असणारे विद्यार्थी नागरिकांसह इतक्या मोठ्या संख्येने एकत्रित येऊन नवी मुंबई स्मार्ट सिटी होणारच असा निर्धार व्यक्त करतात व शहरासाठी आपले योगदान देण्याचे ठरवितात तेव्हा निश्चितच नवी मुंबईचे एकात्म रुप प्रदर्शित होते.
२७ हजाराहून अधिक विद्यार्थी व नागरिक यांच्या सहयोगाने यशस्वी झालेल्या हा उपक्रम लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदला जाणार असून ही समस्त नवी मुंबईकर नागरिकांसाठी अभिमानाची गोष्ट ठरणार असल्याचे सांगत महापौर सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने लिखीत सूचना पत्रे भरून तसेच mygov.in या वेबसाईटला भेट देऊन स्मार्ट नवी मुंबई सिटी विषयीच्या आपल्या सूचना, संकल्पना मोठ्या प्रमाणावर मांडाव्यात व शहर विकासात आपले अमूल्य योगदान द्यावे असे आवाहन केले आहे.