नवी मुंबई : यंदा कधी नव्हे तो प्रथमच नेरूळवासियांची दिपावलीची सुखद सुरूवात झाली. नेरूळ (प.) रेल्वे स्थानकाबाहेर आयोजित ‘दिपावली पहाट’ कार्यक्रमात मराठी व हिंदी गीतांनी नेरूळवासियांना सोमवारी सकाळी सकाळी सांस्कृतिक मेजवानी उपलब्ध झाली. सिडकोचे माजी संचालक व शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळेच दिपावलीला उत्साही प्रारंभ झाल्याची प्रतिक्रिया नेरूळवासियांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
नेरूळ पश्चिम शिवसेना आणि लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दिवाळीच्या निमित्ताने नवी मुंबईकरांना सांस्कृतिक मेजवानी मिळावी याकरता शिवसेनेच्या वतीने नेरूळ (प.) रेल्वेस्थानकाजवळील वाहनतळावर आज सकाळी ‘दिवाळी पहाट’चे आयोजन करण्यात आले होते. सिडकोचे माजी संचालक व शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी या कार्यक्रम आयोजनात पुढाकार घेतला. तसेच माजी नगरसेविका सौ. इंदूमती भगत आणि लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सोमवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते १० या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट’ या सांस्कृतिक कार्यक्रमात मराठी व हिंदी सुमधूर गाण्यांची मैफील सादर करण्यात आली. या कार्यक्रमात शिवसेना खासदार राजन विचारे, नेरूळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता शिंदे-अल्फान्सिसो, शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना नवी मुंबई महिला संघठक सौ. रंजना शिंत्रे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे, शिवसेना शहरप्रमुख विजय माने, मनोज इसवे, महिला आघाडी शहरप्रमुख रोहीणी भोईर, नगरसेवक रंगनाथ औटी, काशिनाथ पवार, माजी नगरसेविका इंदूमती भगत, विभागप्रमुख गणेश घाग, अशोक येवले, शिवसेना शाखाप्रमुख लक्ष्मण पोपळघट, दिपक शिंदे, भाविसेचे बाबु तळेकर, ज्येष्ठ शिवसैनिक बबनदादा पाटील, समाजसेवक किशोर पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शाखाप्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेरूळमध्ये ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये सारेगमफेम गायिका सौ. अनुजा वर्तक, ईटीव्हीफेम गायक निलेश निरगुडकर, सह्याद्री वाहिनीच्या निवेदिका सौ. दिपाली केळकर, गायिका सौ. काश्मिरा राईलवार, आनंद कुलकर्णी, विवेक भागवत, जितु गायकर, समीर कर्वे, चंद्रकांत पांचाळ, सुनील गव्हाणकर आदींच्या गायक सहभागी झाले होते. गायकांच्या सुश्राव्य गायनामुळे मराठी-हिंदी गीतांची मेजवानी नेरूळवासियांना यानिमित्ताने उपलब्ध झाली. या कार्यक्रमाला नेरूळवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून या कार्यक्रमातील गाणी ऐकण्यासाठी रेल्वेस्थानकालगतच्या पादचारी पुलावरदेखील गर्दी जमलेली पहावयास मिळाली. या कार्यक्रमाचे आयोजन यावर्षीपुरतेच सिमित न राहता दरवर्षी आयोजन करण्यात यावे अशा प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या आयोजनाकरता लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व नेरूळमधील शिवसैनिक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.