मुंबई : कल्याण-डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपची कलगीतुरा पाहायला मिळाला. मात्र, दोघांना बहुमताचा आकडा गाठता आला नसल्याने दोघांनी युती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भाजपकडून केडीएमसीत महापौर बसविण्याचा प्रयत्न सुरु होता. शिवसेनेशिवाय आमचा महापौर असता, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री म्हणालेत, कल्याण-डोंबिवलीत आम्ही शिवसेनेची मदत न घेता सत्ता स्थापन करू शकलो असतो, तशी आमची तयारीही होती. मात्र, शिवसेनेकडून मला संपर्क करण्यात आला आणि युतीचा प्रस्ताव आल्यानंतर युतीबाबतचा निर्णय झाला. त्यामुळे भाजपपुढे शिवसेनेला नमते घ्यावे, लागल्याचा संदेश मुख्यमंत्र्यांनी देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरु झालेय.
केडीएमसीत शिवसेना मोठा पक्ष ठरला. त्यामुळे मोठा आणि छोटा भाऊ कोण? याची चर्चा सुरु झाली. मात्र, भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कल्याण-डोंबिवलीत आमचाच महापौर बसणार असे जाहीर करुन टाकले. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचा तसा निर्णय झाला असेल तर आमचा निर्णय आम्ही घेऊ, असे सांगत भाजपला इशारा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक पाऊल मागे घेत, आम्ही सत्तेत आहोत, पाचवर्षे पूर्ण करु आणि मुंबई महानगरपालिकेत युती होईल, असे सांगितले होते. त्यानंतर शिवसेना-भाजपची डोंबिवलीत युती झाली. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी केडीएमसीबाबत नव्याने भाष्य केल्याने भाजप-शिवसेनेत पुन्हा बिनसणार का, याची चर्चा सुरु झालेय.