माडीकेरी : कर्नाटकच्या माडीकेरीमध्ये टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावरुन झालेल्या हिंसाचारामध्ये एका विहिप नेत्याचा मृत्यू झाला असून, पोलिसासह अनेक जण जखमी झाले आहेत.
कर्नाटक सरकारतर्फे १८ व्या शतकातील म्हैसूरचा शासक टिपू सुलतानची राज्यभरात जयंती साजरी करण्यात येत आहे. कर्नाटक सरकारच्या या निर्णयाला विहिपसह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे.
माडीकेरी कोडागु जिल्ह्यात असून, तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा पथके पाठवण्यात आली आहेत. कार्यक्रमस्थळी टिपू जयंतीचे समर्थक आणि विरोधकांमध्ये संघर्ष सुरु झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या आणि जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्जही केला.
विहिपचा स्थानिक नेता कुटाप्पा याचा दगडफेकीमध्ये डोक्याला गंभीर दुखापती झाल्याने जागीच मृत्यू झाला. कर्नाटक सरकारने पहिल्यांदाच टिपू सुलतानची राज्यभरात जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमावर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने बहिष्कार घातला असून, अनेक कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी जयंती साजरी करण्याला विरोध केला होता.
सरकारच्या या निर्णया विरोधात कोडागु जिल्ह्यातील काही संघटनांनी बंद पुकारला आहे. कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले. भाजपाने टिपू जयंतीच्या या कार्यक्रमावर पूर्ण बहिष्कार घातला आहे. भाजपाचे प्रतिनिधी कुठल्याही स्तरावर टिपू जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत असे भाजपाने म्हटले आहे. टिपू कन्नड विरोधी आणि धर्माध होता असे भाजपाचे मत असल्याने भाजपाने या कार्यक्रमावर पूर्ण बहिष्कार घातला आहे.