नवी दिल्ली : दोन मिनिटात पोट भरणारी मॅगी तब्बल पाच महिन्यानंतर बाजारात आली असून ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट स्नॅपडीलवर अवघ्या पाच मिनिटातच मॅगीच्या पहिल्या ६० हजार वेलकम किट्सची विक्री झाली आहे. ही विक्री ‘फ्लॅश सेल मॉडेल’द्वारे केली जाणार असल्याची घोषणा ‘नेस्ले’ने याआधी केली होती.
मॅगीमध्ये शरीराला घातक ठरणारे पदार्थ आढळल्यानंतर भारतातील अनेक राज्यांमध्ये मॅगीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. १२ पॅकेज मॅगी, २०१६ चं कॅलेंडर, मॅगी फ्रिंज मॅग्नेट, मॅगी पोस्टकार्ड आणि वेलकम बॅकचं पत्र असे मॅगीचे किट आहे. याची नोंदणी नऊ नोव्हेंबर पासून सुरू झाली होती.
मॅगीच्या पुढच्या वेलकम किटसाठी मॅगी खवय्यांना वाट पहावी लागणार असून येत्या १६ नोव्हेंबरला हे किट घेता येणार आहे.
भारतातील अतिशय लोकप्रिय असलेल्या मॅगीची खवय्ये गेल्या पाच महिन्यांपासून अतुरतेने वाट पहात होते. मॅगीचे वेलकम बॅक झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे स्नॅपडीलचे वरिष्ठ उपाध्यक्ष टोनी नवीन यांनी सांगितले.