मुंबई : मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्त्वाला साजेसं असं भव्य स्मारक मुंबईतील महापौर बंगल्यातच होईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. बाळासाहेब ठाकरे यांचा आज तिसरा स्मृतिदिन. यानिमित्ताने फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. हे स्मारक पब्लिक ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात येणार असून, या स्मारकाच्या ट्रस्टचे अध्यक्षपद उद्धव ठाकरे यांच्याकडे असेल असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. वर्षभरात हे स्मारक उभारण्याचा आमचा मानस आहे. स्मारक ट्रस्टचे उर्वरित सदस्य व ट्रस्टचे स्वरूप एक-दोन महिन्यांत जाहीर करू असेही त्यांनी सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील महापौर बंगल्यात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेचे सर्व मंत्री व बडे नेते उपस्थित होते. मंत्री पंकजा मुंडे, प्रकाश मेहता आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महापौर बंगला ही हेरिटेज वास्तू आहे. त्यामुळे मुख्य बंगल्याला कोठेही हात न लावता हे स्मारक उभारू. सर्व नियमांचे पालन करूनच हे स्मारक उभारण्यात येतील. हे स्मारक यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकाप्रमाणेच पब्लिक ट्रस्टच्या माध्यमातून उभारले जाईल. या ट्रस्टचे अध्यक्षपद उद्धव ठाकरे यांच्याकडे असेल. तसेत याचे सदस्य कोण असावेत याचा निर्णयही हा ट्रस्ट घेईल. मात्र, स्मारक उभारण्याची अंतिम जबाबदारी राज्य सरकारची असेल असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. वर्षभरात या स्मारकाचे पूर्ण होईल. मात्र, त्यात वेळोवेळी बदल केले जातील. मुंबईच्या महापौरांना बेघर करणार नाही. त्यांना पूर्वीच्या बंगल्यात शिफ्ट केले जाणार आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी मुख्यमंत्री फडणवीस यांचे तमाम बाळासाहेब प्रेमी व शिवसैनिकांच्या वतीने आभार मानतो. बाळासाहेबांचे कार्य पुढे नेण्यासाठी सर्वांना अभिमान वाटेल असंच साजेसं भव्य स्मारक उभारू. राज्य सरकारने अनेक जागा देऊ केल्या होत्या. मात्र, दादरजवळील व बाळासाहेबांचा सहवास लाभलेला महापौर बंगलाच अधिक योग्य वाटला. हे स्थळ निवडण्यामागे आणखी एक कारण आहे. कारण या मार्गावर शेजारी स्वतंत्रसेनानी वीर सावरकर यांचे स्मारक आहे. बाळासाहेब व सावरकर यांना दोन हिंदुह्दयसम्राटांचे एकाच मार्गावर व ठिकाणी स्मारक असण्याचा योग आला आहे. त्यामुळे महापौर बंगल्याची निवड केल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. या ट्रस्टचे स्वरूप लवकरच सर्वांसमोर आणू असे सांगत जर इतरांची इच्छा असेल तर ट्रस्टमध्ये सर्वपक्षीयांना स्थान देऊ अन्यथा आम्ही (शिवसेना-भाजप) सक्षम आहोतच असेही पत्रकारांच्या प्रश्नांवर त्यांनी सांगितले. हे स्मारक कधीपर्यंत पूर्ण होईल असे विचारले असता उद्धव म्हणाले, खरं तर स्मारक उभारणीला वेळेची मर्यादा नसावी. बाळासाहेबांचे विचार समजण्यासाठी सतत त्यात बदल करावेत व इतर सामग्री वाढवली जावीत असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.