नवी मुंबई : ‘कुकशेतचा ढाण्या वाघ’ या नावाने गेली दशकभर नवी मुंबईच्या राजकारणात ओळखले जाणारे व बोनकोडेच्या आक्रमक तरूण तुर्कामधील एक मातब्बर प्रस्थ असणारे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक सुरज पाटील यांचे मंगळवारी दुपारी कुकशेत गावात आगमन झाले अन् त्याच क्षणी कुकशेत गावामध्ये फटाक्याच्या आतषबाजीमध्ये दिपावली उत्सवास प्रारंभ झाल्याचे गावात ठिकठिकाणी पहावयास मिळाले.
गावामधील युवकांच्या मारामारीचे निमित्त झाले, या हाणामारीत सुरज पाटील यांच्या निकटवर्तीयांनी मकरंद म्हात्रे यांना बेदम मारहाण करत जखमी केले. फिर्यादींनी दाखल केलेल्या तक्रारीवरून या मारहाणीला जबाबदार ठरवित सुरज पाटील यांना पोलिस कोठडी व त्यानंतर तळोजा वारी करावी लागली. २९ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर असा तब्बल २० दिवसांचा कालावधी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील सुरज पाटील मित्र परिवाराला, कार्यकर्त्यांना, कुकशेत-सारसोळेच्या ग्रामस्थांना, नेरूळ सेक्टर सहा व दहामधील रहीवाशांना काळजावर दगड ठेवून व्यतित करावा लागला. दिवाळीची सुट्टी लागल्याने न्यायालयीन रजा यामुळे सुरज पाटील यांच्या जामिनास विलंब झाला व दिवाळी सुरज पाटील यांना तळोजा येथे घालवावी लागली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून पक्षसंघटनात्मक कामकाजातून लोकोपयोगी काम करत सुरज पाटील यांनी नेरूळ नोडमध्ये कमालीचा जनाधार वाढविला आहे. स्वत:च्या प्रभागासोबत सभोवतालच्या प्रभागातही सुरज पाटील यांचा नावलौकीक वाढीस लागून राजकीय दबदबा वाढीस लागला आहे. सुरज पाटील यांना तब्बल २० दिवस पोलिस कोठडीत काढावे लागल्याने सारसोळे गाव, कुकशेत गाव, नेरूळ सेक्टर सहा व दहा परिसरात तसेच नेरूळ गावातही काही परिवारांनी दिवाळी साजरी केली नाही. अनेक घरांमध्ये दिवाळीचे फराळ बनविण्यात आले नाही. काही घरांमध्ये लहान मुलांकरता दिवाळीचे फराळ बनविले तरी युवकांनी तसेच महिला-पुरूषांनी दिवाळीच्या फराळाला हातही लावला नाही. २० दिवसाच्या कालावधीत सुरज पाटील यांच्या पत्नी व प्रभाग ८५ मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांच्या मागे जनाधार खंबीरपणे उभा राहीला. केवळ सुरज पाटील यांच्या परिवारावरच नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या, समर्थकांच्या, मित्र परिवाराच्या चेहर्यावरही काळजीचे सावट या कालावधीत स्पष्टपणे पहावयास मिळाले.
सुरज पाटील यांना १६ नोव्हेंबर रोजीच न्यायालयानेे जामिन दिला. तथापि जामिन प्रक्रियेस कालावधी गेल्याने १७ नोव्हेंबर रोजी सुरज पाटील व त्यांच्या अन्य सहकार्यांची तळोजा येथून मुक्तता झाली. या कालावधीत येणार्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देत नगरसेविका सुजाताताई पाटील यांनी सुरज पाटील यांच्या कार्यकर्त्यांना, मित्र परिवाराला, रहीवाशांना, ग्रामस्थांना दिलासा देत परिस्थिती धीरोदत्तपणे सांभाळली.
सुरज पाटील यांचे कुकशेत गावात आगमन होताच फटाक्याच्या आतषबाजीला सुरूवात झाली. कुकशेत गाव, सारसोळे गाव, नेरूळ सेक्टर सहा व दहामधील अनेकांच्या चेहर्यांवर आनंदोत्सव ओसंडून वाहत असल्याचे स्पष्टपणे पहावयास मिळाला.