पंढरपूर : कार्तिकी एकादशी निमित्त राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय पूजा करण्यात आली. यावेळी राज्यातील दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान या संकटापासून राज्यातील जनेतला मुक्त कर, जनता सुखी समाधानी होऊ दे, असे पंढरपूरच्या विठोबाला साकडे घातल्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.
यावेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून मानाची पूजा करण्याचा मान नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील जादुवाडी गावच्या सोमासे दाम्पत्यांना मिळाला. दामोदर सोमासे (८५) आणि लक्ष्मीबाई सोमासे (७८) यांनी मानाची पूजा केली.
कार्तिकी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी सुमारे चार लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. लाखो भाविकांनी चंद्रभागेच्या तिरी स्नानासाठी गर्दी केली. मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग परिसरात मोठी गर्दी पहायला मिळत आहे.
या पूजेनंतर मंदिरालगतच्या संत तुकाराम भवन येथे सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी आमदार सुरेश खाडे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, उल्हास पवार, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, दरवर्षी पंढरपूरला लाखो वारकरी येतात. अनेक वर्षांपासून नियमितपणे आपणही पंढरीच्या वारीला येत असल्याने येथील प्रश्न आपल्याला माहिती आहेत. यात्राकाळात गर्दीमुळे येथील नागरी सुविधा अपुर्या पडतात. हे लक्षात घेऊन येथे येणार्या भाविकांची चांगली व्यवस्था व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेत वारकर्यांना भजन, किर्तन करता यावे, त्यांच्या मुक्कामाची चांगली सोय व्हावी, यासाठी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.