मुंबई : बाजीराव मस्तानी सिनेमातल्या पिंगा गाण्यावरून जोरदार वाद रंगलाय. या गाण्यावर सिनेरसिकांनी, इतिहास संशोधकांनी आणि खुद्द पेशव्यांचा वंशजांनीही तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमातील पिंगा गाण्यावरून चांगलाच दंगा सुरू झालाय. सोशल नेटवर्किंग साईट्सवर सिनेरसिकांनी पिंगावर अक्षरश: टीकेची झोड उठवलीय. तर आता पेशव्यांच्या वंशजांनी या गाण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
पेशव्यांच्या वारसदारांपाठोपाठ इतिहास तज्ज्ञांनीही त्यावर जोरदार आक्षेप घेतलेत. मस्तानी आणि काशीबाईनं एकत्र नृत्य केल्याचा कुठेच पुरावा नसल्याचं इतिहास तज्ज्ञ सांगतायत.
संजय लीला भन्साळीनं सिनेमॅटिक लिबिर्टीच्या नावाखाली जो ‘पिंगा’ घातलाय तो पाहता भन्साळीची क्रिएटिव्हिटी संपत आलीय का? असा प्रश्न सिनेरसिकांना पडलाय. कारण, देवदासमधलं पारो-चंद्रमुखीचं ‘डोला रे डोला’ आणि काशीबाई-मस्तानीचा ‘पिंगा’ या दोन गाण्यातला फरक सांगणं कठीण झालंय.