नवी मुंबई : नोव्हेंबर महिना सुरू होऊनही उकाड्याने हैराण झालेल्या नवी मुंबईकरांना शनिवारी पावसाने दिलासा दिला आहे. ऐन हिवाळ्यात महाराष्ट्राच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. तर नवी मुंबई, ठाणे, कल्याण शहराला पावसाने झोडपले.
राज्यात अनेक ठिकाणी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास पावसाच्या सरी बरसल्या. यावेळी ठाणे, कल्याण, पनवेल तसेच पंढरपूर, बीड जिल्ह्यातील पाटोदामध्येही पावसाने हजेरी लावली.
अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने वाहतूक कोंडी झाली. मात्र, उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांनी या वातावरणाचा आनंद लुटला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रविवारीही काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईतही वाशी,सानपाडा, नेरूळ व अन्य ठिकाणी पाऊसाने बर्यापैकी हजेरी लावली.अचानक आलेल्या पाऊसाने नवी मुंबईकर सुखावले असून आता थंडीचा गारवा अधिकच झोंबण्याची शक्यता पर्यावरणप्रेमी सुकुमार किल्लेदार यांनी व्यक्त केली आहे.