नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवी मुंबईला देशातील स्वच्छ शहरात तृतीय क्रमांकाचे व राज्यात सर्वप्रथम क्रमांकाचे मानांकन जाहीर झाल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिक या त्रिसूत्रीच्या एकत्रित सहभागाने हे मानांकन उंचाविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये लहान वयापासूनच मुलांच्या मनात स्वच्छतेचा संस्कार रुजला तर या मुलांच्या माध्यमातून स्वच्छ व सुंदर शहर निर्मितीला अधिक गतीमानता येईल या विचारातून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष अभियान राबवित निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
नमुंमपा शाळा क्र. ३१, ३२ कोपरखैरणे, नमुंमपा प्राथमिक व माध्यमिक शाळा घणसोली, ज्ञानदिप विद्यालय सेक्टर २ ऐरोली, नमुंमपा प्राथमिक व माध्यमिक शाळा से. १४ ऐरोली, मेहता कॉलेज से. २० ऐरोली, नमुंमपा प्राथमिक व माध्यमिक शाळा दिघा याठिकाणी स्वच्छ व सुंदर नवी मुंबई हा विषय देऊन निबंध व चित्रकला स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या मनातील स्वच्छता विषयक संकल्पनांना कलात्मक सादरीकरण करण्याचे माध्यम उपलब्ध करुन देण्यात आले.
विद्यार्थी दशेत होणारे संस्कार हे माणसाच्या मनात खोलवर रुजतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वत:ला स्वच्छतेचे महत्व कळावे व ती त्यांची सवय व्हावी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांचे पालक, शेजारी, परिसरातील नागरिक यांच्यापर्यंतही हा स्वच्छतेचा संदेश पोहचावा या भूमिकेतून स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ नवी मुंबई मिशन अन्वये विविध उपक्रम राबविण्यात येत असून प्रत्येक उपक्रमाच्या ठिकाणी स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण करण्यात येत असल्याची माहिती स्वच्छ महाराष्ट्र अभियान उपआयुक्त सौ. तृप्ती सांडभोर यांनी दिली. या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभत असून यावेळी स्वच्छता विषयक जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या कलापथकामार्फत सादर होणा-या जनजागृतीपर पथनाट्यालाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
नवी मुंबई हे आपले शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फुर्तीने आपले संपूर्ण योगदान देणे आवश्यक असून नागरिक पातळीवरच ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवला जाणे गरजेचे आहे त्यादृष्टीने नागरिकांनी सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन महापौर श्री. सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.