वाढीव वीजदेयकप्रकरणी शिवसेनेची वीज कार्यालयावर धडक
नवी मुंबई : अवास्तव आलेल्या वाढीव वीजदेयकाने (वीजबिल) जुईनगर व नेरूळमधील रहीवाशी त्रस्त झालेले असतानाच त्यांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी शिवसेना नगरसेवक रंगनाथ औटी यांनी नेरूळ पूर्वेकडील वीज कार्यालयावर रहीवाशी व शिवसेना पदाधिकार्यांसमवेत धडक देत याप्रकरणी रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी केली.
नोव्हेंबर महिन्याचे आलेले वीजदेयक पाहून नेरूळ सेक्टर २,४, जुईनगर सेक्टर २३,२४,२५ व सभोवतालच्या परिसरातील रहीवाशी त्रस्त झाले असल्याने त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी व आलेली भरमसाठ अवास्तव वीजदेयके वीज कार्यालयाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रंगनाथ औटी यांनी रहीवाशी व शिवसेना पदाधिकार्यांसमवेत नेरूळ पूर्वेकडील वीज मंडळाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत बाजूच्या प्रभागातील शिवसेनेचे युवा नगरसेवक विशाल ससाणे, शिवसेना विभागप्रमुख गणेश घाग, उपविभागप्रमुख मनोज चव्हाण, स्थानिक शाखाप्रमुख राजेश पुजारी, स्थानिक रहीवाशी व शिवसैनिक वीज कार्यालयात आले होते.
विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. किन्नुर व श्री. संजय पाटील (अति. कार्यकारी अभियंता) यांच्याशी वीजदेयकाच्या समस्येवर चर्चा करून समस्येचे गांभीर्य व रहीवाशांची संतप्त भूमिका त्यांच्या निदर्शनास आणून दिली. महागाईने एकीकडे कंबरडे मोडले असताना गोरगरीब मध्यमवर्गीयांना भरमसाठ वीज बिले पाठवून त्यांना आर्थिक संकटात टाकू नका असे खडे बोल नगरसेवक रंगनाथ औटी यांनी चर्चेदरम्यान वीज अधिकार्यांना सुनावले.
याप्रकरणी वीज अधिकार्यांनी सकारात्मकता दाखवित लवकरात लवकर वीजदेयकांमध्ये सुधारणा करून स्थानिक रहीवाशांना दिलासा न दिल्यास याप्रकरणी शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक औटी यांनी दिला आहे.
चर्चेदरम्यान नगरसेवक रंगनाथ औटी यांनी वीज अधिकार्यांकडे
१) सदरची वाढीव बिले कोणत्या कारणास्तव व कोणत्या निकषावर दिली आहेत याची सविस्तर माहिती देण्यात यावी. तसेच विभागातील सर्व मिटरची पाहणी करून नादुरूस्त/जास्त रिडींग देत असलेले मिटर त्वरीत बदलण्यात यावेत.
२) काही ठिकाणी विद्युत केबल जुन्या झाल्याने कालबाहय झाल्या आहेत, त्या नव्याने टाकण्यात याव्यात. तसेच मिटर रूम त्वरीत दुरूस्त करण्यात यावे. बरेच वेळा विद्युत भार कमी जास्त झाल्याने घरातील उपकरणे निकामी होत आहेत. तरी त्याबाबत येाग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी केली.
शिवसेना शिष्टमंडळाशी बोलताना वीज मंडळाच्या संबंधित अधिकार्यांनी बिल वाढीबाबत सविस्तर माहिती लेखी स्वरूपात देण्याचे मान्य करून ज्या ठिकाणी चुकीची बिले देली गेली असतील त्या ठिकाणी सर्व्हे करून योग्य तो निर्णय घेतला जाईल तसेच मिटरची लवकरात लवकर पाहणी करून आवश्यक दुरूस्ती केली जाईल असे आश्वासन दिले आहे.