नागपूर : राज्याचे ऍडव्होकेट जनरल श्रीहरी आणे यांच्या वक्तव्यावरुन शिवसेनेने विधान भवनासमोर आज (सोमवार) जोरदार निदर्शने केली. आणे यांच्या हकालपट्टीची मागणी करतानाच सेनेने यावेळी अखंड महाराष्ट्राचा आग्रहही कायम असल्याचे दाखवून दिले. तर, दुसरीकडे भाजप नेते विनोद तावडे यांनी आणे यांच्या वक्तव्याचे समर्थन करत आणेंची भूमिका महाराष्ट्र हिताचीच असल्याचे म्हटले आहे.
ऍड.जनरल श्रीहरी आणे यांनी केलेल्या वक्तव्यावर रविवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीतही शिवसेना मंत्र्यांनी जोरदार आक्षेप घेतला होता. घटनात्मकदृष्ट्या आणे हे महाराष्ट्र सरकारचे ऍडव्होकेट जनरल असताना त्यांचे वेगळ्या विदर्भासाठी जनमत घ्यावे हे तसेच मुंबईसह महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी हुतात्मा झालेल्यांबद्दलचे अवमानकारक वक्तव्य निषेधार्ह असल्याची भावना सेना नेत्यांनी व्यक्त केली होती. याचे तीव्र पडसाद काल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा उमटले.
शिवसेनेने विधान भवनासमोर आणेंच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. आणे यांच्या हकालपट्टीची मागणी करतानाच सेनेने यावेळी अखंड महाराष्ट्राचा आग्रहही कायम असल्याचे स्पष्ट केले. अधिवेशनाचे कामकाज सुरु होण्याआधी सकाळी ११ वाजता सेना आमदारांनी हे आंदोलन केले. यावेळी शिवसेना आमदारांच्या घोषणांनी विधान भवन परिसर दणाणून गेला होता. शिवसेनेचे हे आंदोलन अधिवेशनाच्या आगामी काळात भाजपची डोकेदुखी वाढवणारे ठरणारे आहे.
****
गेली पंधरा वर्ष अधिवेशन बंद पाडण्याची आजच्या सत्ताधार्यांनी विरोधक असताना प्रथा पाडली होती. ती आम्ही पाळणार नाही. अधिवेशन चालू ठेऊन दुष्काळासह प्रत्येक प्रश्नावर आम्हाला चर्चा करायची आहे. सरकारला जाब विचारायचा आहे आणि जनतेला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी सरकार सोबत सभागृहात आणि सभागृहाबाहेर संघर्ष करण्याची आमची तयारी आहे. मात्रा सत्ताधारीच विरोधकांना अधिवेशन चालू द्यायचे नाही असा प्रचार करून खोडसाळपणा करत आहेत.
– धनंजय मुंडे, विरोधी पक्ष नेता, विधानपरिषद