पुणे : पवनानगर (मावळ) येथील आंबेगावमध्ये माजी सरपंच दत्तात्रय रसाळ यांची विद्यमान सरपंचाकडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमधील वादातून ही घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. दत्तात्रय रसाळ असे या घटनेतील मृतकाचे नाव आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते असलेले ३६ वर्षीय दत्तात्रय रसाळ हे जमीन खरेदी विक्री आणि हॉटेलचा व्यवसाय करत होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान वाद झाला होता. त्या वादातूनच हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी आंबेगावचे विद्यमान सरपंच अशोक राजीवडे, विनायक राजीवडे, बाळू राजीवडे आणि मनोहर राजीवडे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी बाळू राजीवडे आणि मनोहर राजीवडे यांना ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दत्तात्रय रसाळ हे लोणावळ्यात एका लग्नासाठी आले होते. हे पुन्हा घरी जाण्यासाठी मित्र लहू शेळके यांच्या दुचाकी वरून निघाले होते. रसाळ आणि शेळके पाले शिंद गावाच्या वेशीवर आल्यावर अचानक घटनेतील चारही आरोपीने दोघांवर धारधार शस्त्राने हल्ला केला व मारेकर्यांनी पळ काढला. रसाळ आणि शेळके यांना लोणावळा येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मारेकर्यांनी केलेल्या हल्ल्यात रसाळ यांच्या चेहर्यावर ३ ते ४ वार व डाव्या हातावर एक आणि पोटावर एक असे वार करण्यात आले होते . त्यामुळे अती रक्तस्राव होऊन रसाळ यांचा मृत्यू झाला. शेळके यांच्या डोक्यावरही एक वार असून त्यांना पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.