दिपक देशमुख
नवी मुंबई :महापालिका प्रभाग ८७मध्ये गुरूवारी सकाळी आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केलेल्या पाहणी अभियानास स्थानिक रहीवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून रहीवाशी मोठ्या संख्येने या पाहणी अभियानात सहभागी झाले होते. स्थानिक शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी या पाहणी अभियानाकरता आयुक्तांकडे सातत्याने लेखी पाठपुरावा केला होता व महासभेदरम्यान या विषय उपस्थित करत सभागृहाचे लक्षही नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी वेधले होते.
सकाळी ११.१५ वाजता मनपा आयुक्त दिनेश वाघमारे हे प्रभाग ८७ मधील राजीव गांधी उड्डाणपुलाखालील परिसरात आले. नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे व माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी मनपा आयुक्तांचे स्वागत कले. यावेळी आयुक्तांसमवेत मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार, उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर, डॉ. बाबासाहेब रांजळे, चाबुकस्वार, अरविंद शिंदे, सुनील लाड, इंगळे, चव्हाण, राठोड, सोनवणे, उमेश पाटील व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मानक रूग्णालयापासून या पाहणी अभियानास आयुक्तांनी सुरूवात केली. सुरूवातीला ग्रीनफिल्ड सोसायटीतील समस्या जाणून घेतल्यावर त्यांनी शाहू महाराज उद्यानात फेरफटका मारत तेथील पाहणी केली. त्यानंतर उद्यानालगतच्या ग्रंथालय व वाचनालयाची पाहणी केली. तेथील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. वाचनालय व ग्रंथालयाला जागा कमी पडत असल्यास एफएसआय वाढवा, पण विद्यार्थ्यांची गैरसोय होता कामा नये अशा सूचना यावेळी आयुक्तांनी केल्या. कथा-कांदबर्यांच्या जोडीला स्पर्धा परिक्षेची पुस्तके ग्रंथालयात वाढवा, मुलांना स्पर्धा परिक्षांना उपयुक्त ठरेल असे साहीत्य वाढविण्याच्या सूचनाही आयुक्तांनी संबंधितांना केल्या. वाचनालय व ग्रंथालयाच्या संरक्षक भिंतीची पाहणी केली. त्यानंतर आयुक्तांनी शिवनेरी ते संजीवनी सोसायटीदरम्यानच्या नाल्याची पाहणी केली. शेरे उद्यानात सुरू असलेल्या योगासाठी शेड व चौथारा उभारण्याची गरज आयुक्तांनी व्यक्त केली. या पाहणी अभियानात प्रभागातील सर्वच पदपथाची पाहणी तसेच बाह्य व अर्ंतगत रस्त्याची पाहणी आयुक्तांनी केली. विभागातील गृहनिर्माण सोसायट्यांना भेटी देताना तेथील रहीवाशांशी सुसंवाद साधला. प्रभागातील फेरीवाल्यांच्या व टपरीवाल्यांच्या अतिक्रमणाबाबत आयुक्तांनी नाराजी व्यक्त करत समाधान हॉटेलजवळील टपरीवाल्यांची अतिक्रमणे लवकरात लवकर काढण्याचे आयुक्तांनी संबंधितांना निर्देश दिले. पदपथावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण व समाधान हॉटेलजवळील चायनीजवाल्यांच्या अतिक्रमणाकडे मनपा प्रशासन कानाडोळा करत असल्याच्या तक्रारीही यावेळी स्थानिक रहीवाशांनी केल्या. उद्यानात आयुक्त फेरफटका मारत असताना स्थानिक नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवेंनी उद्यानात स्पीकर व सूचना फलक बसविण्याची मागणी करताना प्रभागात सीसीटीव्ही बसविण्याचीही मागणी केली.
यावेळी पाहणी अभियानात नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे, माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे, सौ. सत्वशीला जाधव, शरद पाजंरी, कल्पना पाजंरी, प्रकाश वाघमारे, प्रकाश कारभार, अरूण त्रिवारी, पाटील, बाबाजी चांदे, डॉ. उज्जैनकर, पॉल, मोडवे, राजू निगडे, अमोल सणस, अतुल ठाकूर, रणजित जाधव, खेडकर, चिकणे, ठाकूर, म्हात्रे, राकेश वाघमारे, गमरे, भाटकर, निखिल मांडवे, सौ.बेळे, सौ.परब, सौ.चांदे, सौ.उवर्र्शी मिस्त्री, सौ.नाईक, सौ.खोत, सौ. मांडवकर, सौ.डांगे, सौ.घाग, सौ.सावंत, सौ. भालेकर, सौ. बनकर. सौ.पवार, सौ.भट्टी, सौ. सुरेखा मोरे, सौ.सुजाता सावंत, सौ.पेडणेकर, सौ. उगवेकर, सौ.जाधव यांच्यासह स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तब्बल दीड तास चाललेल्या या पाहणी अभियानात नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी आयुक्तांना प्रभागातील समस्या व असुविधांची माहिती दिली.