दत्ता पडसाळगीकर बनणार मुंबईचे पोलीस आयुक्त?
मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची सौदी अरेबियातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राकेश मारिया यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यानंतर अहमद जावेद यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्याआधी ते गृहरक्षक दलाचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते.
अहमद जावेद हे ३९ वे पोलीस आयुक्त ठरले होते. आता जावेद अहमद यांनी सौदी अरेबियातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सौदी अरेबिया सरकारकडून अहमद जावेद यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आल्यानंतर त्याबाबतची औपचारिक घोषणा शुक्रवारी करण्यात आली.
दरम्यान, केंद्रीय गुप्तचर विभागातील वरिष्ठ अतिरिक्त पोलीस महासंलक दत्ता पडसाळगीकर यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदासाठी दत्ता पडसाळगीकर, संजय बर्वे, सतीश माथूर, सुबोध जैस्वाल आदींची नावे चर्चेत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील म्हणून ओळखले जाणारे दत्ता पडसाळगीकर यांचे नाव आघाडीवर असल्याची सूत्रांची माहिती आहे.