नवी मुंबई : आजच्या माहिती तंत्रयुगाला सामोरे जाताना नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाची वाटचाल डिजिटल स्कुल निर्मितीच्या दिशेने गतिमानतेने सुरू झाली आहे. यादृष्टीने नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षण विभागाचे उपायुक्त डॉ. ए.आर.पटनिगीरे यांच्या पुढाकाराने नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील शिक्षकांसाठी ‘डिजिटल कार्यप्रेरणा कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. शहापूर, पष्टेपाडा येथील अनुभवसंपन्न तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांच्या प्रेरक सहभागाने शनिवारी महानगरपालिका शाळा क्र. ५४/५५, राजर्षी शाहू महाराज विद्यालय, आंबेडकर नगर, राबाडा येथे ‘डिजिटल कार्यप्रेरणा कार्यशाळा’ संपन्न झाली.
या कार्यशाळेचा लाभ ३५० हून अधिक शिक्षक तसेच विस्तार अधिकारी, सहा. कार्यक्रम अधिकारी, केंद्र समन्वयक आणि मुख्याध्यापक यांनी घेतला. व्याख्याते संदीप गुंड यांनी उपस्थित शिक्षकांना डिजिटल कार्यप्रेरणा या विषयावर दिलखुलास शैलीत प्रशिक्षण दिले.याप्रसंगी शिक्षण विभागाचे उपायुक्त डॉ. ए.आर.पटनिगीरे, सहा. आयुक्त बाळकृष्ण पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या सर्व शाळांमध्ये डिजिटायलेजेशन पद्धतीने शिक्षण उपलब्ध करुन देणे, दफ्तराचे ओझे कमी करण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी टॅबचा वापर करणे आदी पध्दती कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने या माहितीपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.