नवी मुंबई : महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला व बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या नोंदणीकृत महिला संस्था/ महिला मंडळ यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
याकरीता नमुंमपा क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणारी महिला मंडळे / संस्था यांच्याकडून पुरस्कारासाठी विहित नमुन्यात नामांकने मागविण्यात येत असून विहीत नमुन्यातील अर्ज आठही विभाग कार्यालयांत तसेच योजना विभाग, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, तळमजला, से. १५ए, सी.बी.डी. बेलापूर येथे उपलब्ध आहेत. पुरस्काराकरीता सहभागी होऊ इच्छिणार्या संस्थांनी आपले अर्ज २३ डिसेंबर २०१५ रोजी पर्यंत सादर करावयाचे आहेत.
तसेच नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला व बालकल्याण घटकांतर्गत ३ जानेवारी २०१६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत असून या या स्पर्धांकरीताही इच्छुक स्पर्धकांकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये ’रांगोळी स्पर्धा’ ही विभाग कार्यालय स्तरावर घेण्यात येत असून यामध्ये फ्री हॅन्ड, निसर्गचित्र किंवा देशभक्तीपर रांगोळी हे स्पर्धा विषय आहेत. या स्पर्धेकरीता अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ डिसेंबर आहे.
त्याचप्रमाणे भाताचे विविध प्रकार या विषयावर पाककला स्पर्धा आणि सॅलेड सजावट स्पर्धा अशा दोन स्पर्धांकरीता ३० डिसेंबर पर्यंत अर्ज भरावयाचे आहेत. तसेच महिलांकरीता स्मार्ट नवी मुंबई या विषयावर २८ डिसेंबर पर्यंत निबंध स्पर्धेकरीता निबंध सादर करावयाचे आहेत.
स्पर्धांची सविस्तर माहिती, अर्ज, नियम, अटी व शर्ती महानगरपालिकेची सर्व आठ विभाग कार्यालये व उप आयुक्त, समाज विकास विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर भवन, पहिला मजला, से. ११, सी.बी.डी., बेलापूर येथे शासकीय सुट्ट्या वगळून इतर दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. या स्पर्धेमध्ये केवळ नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणार्या महिलाच सहभागी होऊ शकतात.
या अनुषंगाने महिला मंडळे / महिला बचत गट यांनी उत्पादीत केलेल्या साहित्याची विक्री करण्यासाठी विनामुल्य स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येत असून त्याकरीता ३० डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. याबातच्या अधिक माहितीकरीता ०२२-२७५६३५०५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त महिला मंडळ / महिला बचत गट यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अपर्णा गवते व उपसभापती श्रीम. संगीता बोर्हाडे यांच्या वतीने करण्यात येत आहे.