नवी मुंबई : स्वच्छता ही आरोग्यासाठी अतिशय महत्वाची असून आपल्या घराप्रमाणेच आपला परिसर स्वच्छ राहील याकडे लक्ष ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे या भावनेतून हागणदारीमुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली असल्याचे सांगत नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी महापालिकेच्या माध्यमातून वैयक्तिक शौचालयासाठी देण्यात येणार्या अनुदानाचा लाभ घेऊन नवी मुंबई शहरातील 100 टक्के लोक शौचालयाचा वापर करतील असा विश्वास व्यक्त केला. यामधून नवी मुंबईचा स्वच्छतेबाबत देशात तिसरा क्रमांक पहिला होण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करु असे आवाहन त्यांनी केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियान यामध्ये स्वच्छ नवी मुंबई मिशन अंतर्गत आयोजित हागणदारीमुक्त शहराकरीता जनजागृती रॅली तसेच आदिवासी कुटुंबियांना वैयक्तिक शौचालय अनुदान पत्रे वितरण समारंभाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. यावेळी एम्पथी फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी कॅन्सर तपासणी शिबिर तसेच महानगरपालिकेच्या वाहनचालकांकरीता मोफत आरोग्य व नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप शिबिर संपन्न झाले.
यावेळी महापौरांसमवेत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती प्रकाश मोरे, आरोग्य समिती सभापती पुनम पाटील, नगरसेविका रंजना सोनवणे, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, मालमत्ता विभागाचे उप आयुक्त व स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष प्रमुख दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ 1 चे उप आयुक्त श्री. सुभाष इंगळे, समाज विकास विभागाच्या प्र. उप आयुक्त संध्या अंबादे, सहा. आयुक्त दत्तात्रय नागरे व श्री. साहेबराव गायकवाड तसेच एम्पथी फाऊंडेशनचे विश्वस्त विनोदकुमार जैन, सुंदरेश्वरम व इतर मान्यवर अतिथी उपस्थित होते.
महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी याप्रसंगी बोलताना नवी मुंबईचा स्वच्छतेमध्ये देशात असलेला तृतीय क्रमांक उंचाविण्यासाठी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात असून हागणदारीमु्क्त शहरासाठी प्रयत्न केले जात आहेत. याकरीता आयोजित करण्यात आलेल्या जनजागृतीपर रॅलीत विद्यार्थ्यांसह नागरिकांनी उत्साहाने सहभागी होऊन रॅली यशस्वी केल्याबद्दल त्यांनी जागरुक नागरिकांचे आभार मानले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठिकठिकाणी सार्वजनिक व सामुहिक शौचालये उभारली जात असून केंद्र व राज्य शासनाच्या वतीने वैयक्तिक शौचालयासाठी देण्यात येणार्या 12 हजार रक्कमेच्या अनुदानामध्ये महानगरपालिकाही 5 हजार इतकी रक्कम देत असल्याची माहिती देत आयुक्तांनी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा व आपले शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी संपूर्ण योगदान द्यावे तसेच या कामी महिला बचत गटांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जात असल्याचे सांगितले. त्याबरोबरच वाहनचालकांवर असलेला तणाव लक्षात घेऊन त्यांच्याकरीता काही दिवसांपुर्वी कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती देत त्याच अनुषंगाने वाहनचालकांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे कुटुंबाकडे लक्ष देतादेता महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष लक्षात घेऊन महिलांसाठी कॅन्सर तपासणी शिबीर आयोजित केले जात असल्याचे सांगत त्यांनी आरोग्य शिबीरासाठी सहकार्य करणार्या एम्पथी फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेचे आभार मानले.
यावेळी दीड हजारहून अधिक विद्यार्थी हागणदारीमुक्त शहराचा प्रचार करीत जनजागृती रॅलीत उघड्यावर शौचालयास बसणे टाळा – रोगराईला घाला आळा, शौचालय आहे जिथे – खरी प्रतिष्ठा मिळेल तिथे अशा घोषणा देत उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी 24 आदिवासी कुटुंबांना वैयक्तिक शौचालय अनुदानपत्रे वितरीत करण्यात आली.