नवी मुंबईः ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेविका शशिकला मालदी यांचा ऑक्टोबर महिन्यात मृत्यू झाल्यानंतर आता त्या प्रतिनिधीत्व करीत असलेल्या नेरुळमधील प्रभाग क्रमांक ८८ मध्ये पोटनिवडणूक जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या १० जानेवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे.
गत २३ सप्टेंबर रोजी शशिकला मालदी घरातून निघून गेल्यावर घरच्यांनी त्या हरविल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह २ अऍक्टोबर रोजी मानखुर्द-गोवंडी दरम्यान रेल्वे मार्गाजवळ मिळून आला होता. यानंतर नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पण, तेव्हापासून शशिकला मालदी यांच्या मृत्युचे गुढ अद्यापही कायम आहेत.
शशिकला मालदी यांच्या मृत्युनंतर त्यांच्या रिक्त झालेल्या नगरसेवक पदासाठी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहिर केली आहे. त्यानुसार १५ ते २२ डिसेंबर या कालावधीत अर्ज देण्यात-स्वीकारण्यात येणार आहे. २३ डिसेंबर रोजी नामनिर्देशन अर्जांची छाननी होऊन त्याच दिवशी पात्र उमेदवारांची यादी जाहिर करण्यात येणार आहे. २८ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे, ३० डिसेंबर रोजी निवडणूक चिन्ह देणे आणि अंतिमरित्या निवडणूक लढविणार्या उमेदवार तसेच मतदार यांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यानंतर १० जानेवारी २०१६ रोजी प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया राबविली जाऊन त्याच्या दुसर्या दिवशी ११ जानेवारी रोजी निकाल जाहिर करण्यात येणार आहे.