पुणे : शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्यावर मंगळवारी पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आपल्या नेत्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकर्यांनी त्यांच्या अंत्ययात्रेला गर्दी केली होती.
अंत्यसंस्कारापूर्वी शरद जोशी यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. शरद जोशी यांचे शनिवारी निधन झाले होते. त्यांच्या दोन्ही मुली परदेशात असल्यामुळे मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्याआधी शरद जोशी यांचे पार्थिव सकाळी दहा वाजल्यापासून डेक्कन बसस्थानकामागील नदीपात्रातील मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, गुणवंत पाटील हंगरगेकर यांच्यासह राज्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या शेतक-यांनी जोशींना श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यदर्शनासाठी परराज्यातूनही अनेक लोक आले होते.
शरद जोशी यांच्या पश्चात श्रेया शहाणे (कॅनडा) आणि डॉ. गौरी जोशी (अमेरिका) या दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.