नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नागरिकांमध्ये वैयक्तिक व सामाजिक स्वच्छतेविषयी जाणीवजागृती व्हावी यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यामध्ये लोकसहभागाला प्राधान्य देण्यात येत आहे. याच अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या पेन्ट युवर सिटी या जनजागृतीपर उपक्रमात लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट 323 ए 2 या संस्थेच्या सहयोगाने स्वच्छतेचा संदेश प्रसारीत करणारे वॉल पेंटींग से. 16, वाशी येथील पे ण्ड पार्किंगच्या भिंतीवर करण्यात आले आहे. या वॉल पेंटींगमध्ये महात्मा गांधीजींचे रेखाचित्र व स्वच्छता करताना मुलांसह मोठी माणसे चित्रित करण्यात आली आहेत.
या चित्र माध्यमातून जनमानसामध्ये स्वच्छतेचा संदेश प्रसारीत करताना चित्र काढण्यातही लायन्स क्लब सारख्या नामांकित संस्थेने सहयोगी भूमिका दिली असून याव्दारे दोन्ही गोष्टीत लोकसहभाग लाभला आहे. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, परिमंडळ 1 चे उप आयुक्त सुभाष इंगळे, इटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत, लायन्स क्लबचे प्रकल्प डिस्ट्रीक्ट चेअरमन एन.आर. परमेश्वरन, आइसलॅन्ड येथील लायन्स क्लबचे संचालक प्रताप पास्त, जॉन, लायन्स क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर नितिन शेट्टी, सुभाष भलवा आणि विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.