कोल्हापूर : बहिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावानेच आपल्या बहिणीची आणि तिच्या पतीची गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरात घडला आहे. ही घटना बुधवारी रात्री १० च्या सुमारास घडली.
घरच्यांच्या विरोधाला न जुमानता इंद्रजीत कुलकर्णी आणि मेघा पाटील यांनी २४ जून २०१५ मध्ये आंतरजातीय प्रेमविवाह केला. मात्र, सहा महिन्यांपासून मेघाच्या भावांच्या मनात हा राग होता. त्यामुळे त्यांनी या दोघांची हत्या केली.
गणेश पाटील, जयदीप पाटील आणि त्यांचा मित्र नितीन काशीद अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
इंद्रजित आणि मेघा कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात गणेश नगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. बुधवारी रात्री त्यांच्या खोलीतून आरडाओरड झाल्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांचे घरमालक खोलीत गेले असता त्यांना धक्का मारून आरोपी पळून गेले. त्यावेळी खोलीमध्ये इंद्रजीत, मेघा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.