नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका शशिकला मालादी यांच्या आकस्मित निधनामुळे रिक्त झालेल्या नेरुळमधील प्रभाग क्रमांक-८८ च्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने शिल्पा सूर्यकांत कांबळे यांच्या उमेदवारीची घोषणा आज (ता.१७) गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक यांनी केली आहे.
नेरुळ सेक्टर-३ येथील श्री साईबाबा मंदिराच्या प्रांगणात कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पोटनिवडणूक प्रचाराचा शुभारंभ करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने या पोटनिवडणुकीत आघाडी घेतली आहे. नाईक यांनी उपस्थित पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मालादी यांची प्रभाग क्रमांक-८८ च्या विकासाची स्वप्ने साकार करण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बहुमतांनी जिंकून देण्याचे आवाहन नागरिकांना केले.
नेरूळ परिसरावर लोकनेते गणेश नाईक यांचे विशेष प्रेम आहे. दिवंगत मालादींच्या रुपाने त्यांनी एका सर्वसामान्य कुटुंबातील कर्तव्यतत्पर महिलेला नगरसेवक होण्याची संधी दिली होती परंतु त्यांच्या आकस्मित निधनाने ही पोटनिवडणूक लागली असून आमच्या आईचे राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रभागाचा परिपूर्ण विकास करण्याचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार शिल्पा कांबळे यांना निवडून देण्याचे आवाहन याप्रसंगी मालादी यांची मुलगी अनुराधा आणि मुलगा सुशांत या दोघांनी केले.
आजच्या निवडणूक प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार, महापालिकेचे सभागृह नेते जयवंत सुतार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महिला जिल्हा अध्यक्षा माधुरी सुतार, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, माजी जिल्हा अध्यक्ष गोपीनाथ ठाकूर, माजी नगरसेवक सुरेश शेट्टी, कान्हा म्हात्रे, मुक्तारसिंग शेठ, केशव सावंत, हरिश्चंद्र काळे, एस.के.मुखरे, मंगला करपे, शोभा जाधव, सविता जडीया, सरोज गायकवाड, बबिता अरोरा, मंगल टिबे, अमरजित कौर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक ८८ मध्ये पोटनिवडणुकीकरिता येत्या १० जानेवारी २०१६ रोजी मतदान घेतले जाणार आहे.१५ ते २२ डिसेंबर या कालावधीत अर्ज देण्यात-स्वीकारण्यात येणार आहे. २३ डिसेंबर रोजी नामनिर्देशन अर्जांची छाननी होऊन त्याच दिवशी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. २८ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे, ३० डिसेंबर रोजी निवडणूक चिन्ह देणे आणि अंतिमरित्या निवडणूक लढविणार्या उमेदवार तसेच मतदार यांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यानंतर १० जानेवारी रोजी मतदान झाल्यानंतर दुसर्या दिवशी ११ जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.